कतार खुल्या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा करत सेरेना विल्यम्सने जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी झेप घेतली. अव्वल स्थान पटकावणारी सेरेना सगळ्यात मोठय़ा वयाची खेळाडू ठरली आहे. कतार खुल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेरेनाने पेट्रा क्विटोव्हावर ३-६, ६-३, ७-५ असा विजय मिळवला. या जेतेपदासह सेरेनाने व्हिक्टोरिया अझारेन्काला मागे टाकत अव्वल स्थान पटकावले. सेरेनाआधीचा विक्रम ख्रिस इव्हर्टच्या नावावर होता. तिने ३०व्या वर्षी अव्वल स्थान कब्जा केला होता. अंतिम सामन्याच्या तिसऱ्या सेटमध्ये पराभवाच्या उंबरठय़ावर असणाऱ्या सेरेनाने सातपैकी सहा गुणांची कमाई करत दिमाखदार विजय मिळवला. सहाव्यांदा सेरेना अव्वल स्थानावर कब्जा करणार आहे. हे स्थान मी पटकावले याचा मनापासून आनंद होत आहे. दुखापतींवर मात करत हे स्थान मिळवणे अतिशय कठीण होते. यामागे प्रचंड मेहनत आहे, पण मला यावर समाधान मानून चालणार नाही असे सेरेनाने सांगितले. गेल्यावर्षी दुखापतींच्या ससेमिऱ्यातून बाहेर पडत सेरेनाने शानदार पुनरागमन केले होते. विम्बल्डनचे जेतेपद, त्यापाठोपाठ ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकावर कब्जा तसेच अमेरिकन खुल्या स्पर्धेचे जेतेपदही सेरेनाने पटकावले.