सचिन तेंडुलकर हा तिच्यासाठी दैवत होता. सचिनला याचि देही याचि डोळा पाहण्याचं भाग्य तिला मिळालं. त्यातूनच प्रेरणा घेत तिने बॅट हाती घेतली. अत्यंत आक्रमक पद्धतीने फटकेबाजी करणाऱ्या शफाली वर्माची कहाणी स्वप्नवत वाटावी अशी. वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेत अचानक संधी मिळालेल्या शफालीला ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सेमी फायनलचा करो या मरो सामना खुणावतो आहे.

वूमन्स वर्ल्डकप स्पर्धेत रविवारी भारत-बांगलादेश सामनादरम्यान भारतीय संघाची धडाकेबाज सलामीवीर प्रतिका रावळला दुखापत झाली. ही दुखापत गंभीर असल्याचं स्पष्ट झालं. प्रतिका रावळ सेमी फायनल आणि फायनलमध्ये खेळू शकणार नसल्याचं स्पष्ट झालं. प्रतिकाची दुखापत गंभीर असल्याचं स्पष्ट होताच तातडीने शफाली वर्माला निरोप पाठवण्यात आला. शफाली डोमेस्टिक स्पर्धेच्या निमित्ताने सुरत इथे होती. काही तासात शफाली नवी मुंबईत दाखल झाली. प्रतिकाने न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी साकारली होती. स्पर्धेत स्मृती मानधनाच्या बरोबरीने तिने संघाला दमदार सलामी मिळवून दिली होती. भारतीय संघाला प्रतिकाची उणीव नक्कीच भासणार आहे. मात्र प्रतिकाच्या जागी तडाखेबंद फलंदाजी करणाऱ्या शफालीचा समावेश झाल्याने भारतीय संघ आणखी मजबूत झाला आहे.

शफालीने १५व्या वर्षीच भारतासाठी पदार्पण केलं. प्रतिस्पर्धी गोलंदाजांचा समाचार घेत चेंडूच्या ठिकऱ्या उडवणारी तडाखेबंद फलंदाजी ही शफालीची खास ओळख. यातूनच तिला लेडी सेहवाग ही बिरुदावली मिळाली आहे. पदार्पणाच्या सामन्यातच शफालीने ४९ चेंडूत ७३ धावांची वेगवान खेळी केली होती.

सचिनला पाहिलं आणि मिळाली प्रेरणा

दिल्लीजवळच्या रोहतक इथे २०१३ मध्ये सचिन तेंडुलकर रणजी सामना खेळण्यासाठी गेला होता. त्यावेळी शफाली फक्त ९ वर्षांची होती. क्रिकेटविश्वाचं दैवत असलेल्या सचिनने त्या लढतीत लौकिकाला साजेसा खेळ करत मुंबईच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली होती. सचिनचा अद्भुत खेळ पाहून लहानही शफाली प्रेरित झाली. योगायोग म्हणजे पुढे जाऊन शफालीने सचिनचाच विक्रम मोडला. शफालीने १५ वर्ष २८५ दिवस, वयाची असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावलं. सचिनने १६वर्ष, २१४ दिवसांचा असताना अर्धशतक झळकावलं होतं. पदार्पणाच्या सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत शफाली तिसऱ्या स्थानी आहे. इंग्लंडविरुद्धच्या ब्रिस्टल इथे झालेल्या टेस्टमध्ये शफालीने पहिल्या डावात ९६ तर दुसऱ्या डावात ६३ धावांची खेळी साकारली होती.

सचिनने दिली स्वाक्षरी आणि दिला सल्ला

ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान सिडनी इथे हॉटेलमध्ये शफालीला सचिनला भेटण्याची संधी मिळाली. प्रशिक्षक डब्ल्यू व्ही रामन यांनी शफालीला सचिन आल्याची खूण केली. सचिनच्या दर्शनाने भारावलेल्या शफालीने सेल्फीसाठी विनंती केली. सचिनने तात्काळ होकार दिला. सेल्फी काढताना सचिनने शफालीला सल्लाही दिला. इथे उजेड कमी आहे, आपण दुसऱ्या दिशेला जाऊन फोटो काढूया असं सचिनने सांगितलं आणि शफालीला क्रिकेटच्या दैवताबरोबर झकास सेल्फी मिळाला.

लहानपणी जोरकस फटके मारण्यासाठी मिळायचे १० रुपये

शफालीच्या कारकिर्दीत तिचे वडील संजीव यांची भूमिका मोलाची आहे. शफालीचे पहिले प्रशिक्षक तेच होते. पल्लेदार फटके लगावण्यासाठी संजीव शफालीला आव्हान देत असत. जोरकस फटके लगावण्यासाठी शफाली आणि तिच्या भावाला १० रुपये बक्षीस मिळत असे.

भावाच्या जागी खेळण्यासाठी कापले केस

मुलींसाठी केस हा जिव्हाळ्याचा मुद्दा असतो. मात्र क्रिकेट खेळायला मिळावं यासाठी शफालीने १०व्या वर्षी अगदी बारीक केस कापले होते. शफालीचा भाऊही क्रिकेट खेळतो. एका स्पर्धेवेळी तो आजारी पडला. मुलांची U12 स्पर्धा होती. शफालीचे केस मुलांसारखे अगदी बारीक कापण्यात आले. पानिपत इथे झालेल्या या स्पर्धेत शफाली भावाच्या जागी मुलगा म्हणून खेळली. धुवांधार फटकेबाजी करत शफालीने सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार पटकावला.

२१वर्षीय शफालीने ५ टेस्ट, २९ वनडे आणि ९० टी२० सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. कॉमनवेल्थ स्पर्धेत रौप्यपदकविजेत्या भारतीय संघाचा शफाली भाग होती. पहिल्यावहिल्या U19 टी२० वर्ल्डकप स्पर्धेत शफालीच्या नेतृत्वातच भारतीय संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. वूमन्स प्रीमिअर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाने २ कोटी रुपयांची बोली लावून ताफ्यात समाविष्ट केलं होतं.