Virat Kohli Retirement: कोहलीच्या निवृत्त होण्याच्या संभाव्यतेवर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने न मागता सल्ला दिला आहे. कोहलीच्या उत्कृष्ट कारकीर्दीबद्दल कौतुक करतानाच कोहलीने वेळेत निवृत्ती घ्यायला हवी असेही म्हंटले आहे. कोहलीने स्वतःच्या चांगल्या रेकॉर्डवर निवृत्ती घेतल्यास लोक त्याला लक्षात ठेवतील पण स्वतःची सावली बनून राहिला व फॉर्म बिघडेपर्यंत आणि लोकं नाव ठेवायला लागेपर्यंत किंबहुना संघाने स्वतः त्याला वगळण्यापर्यंत खेळत राहू नये असेही आफ्रिदीने पुढे म्हंटले आहे.
भारताचा माजी कर्णधार कोहली हा एमएस धोनीच्या निवृत्तीपूर्वीच भारतीय क्रिकेटचा आश्वासक चेहरा बनला होता. फलंदाजीच्या शिखरावर पोहोचून आणि नंतर सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार होण्याच्या मार्गावर भारतीय संघाचे नेतृत्व करत, कोहलीने एक अतुलनीय करिअर अनुभवले आहे. प्रत्येक सामन्यात कोहली काही ना काही विक्रम नोंदवतो ज्यामुळे त्याची महानता सिद्ध होते.
पुढे आफ्रिदी म्हणतो की, सर्व चांगल्या गोष्टींप्रमाणेच कोहलीची कारकिर्द कधीतरी संपणार आहे आणि वेळ आल्यावर तो आपलं नाव कोणत्या रेकॉर्डसह जोडून माघार घेतो हे सर्वांच्या लक्षात राहणार आहे. त्यामुळे ही वेळ त्याने काळजीपूर्वक निवडावी. जो खेळाडू गोलंदाजांना व यष्टिरक्षकांना सळो की पळो करायचा त्या कोहलीसाठी मागील दोन वर्ष कठीण होती असे म्हणताना नुकत्याच संपलेल्या आशिया चषक २०२२ मध्ये कोहलीचे पहिले T20I शतक हे त्याची कारकीर्द संपण्याआधीची एक मोठी उडी असू शकते असाही अंदाज आफ्रिदीने केला आहे.
ICC T20 World Cup 2022: आयसीसी टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघ ठरला; रोहित शर्मा कर्णधार तर विराटला..
दरम्यान, कोहली हा तिन्ही फॉरमॅट खेळत असल्याने त्याला लक्ष केंद्रित करणे जमत नाही. यावर उपाय म्हणून त्याने एखाद्या फॉरमॅटमधून बाहेर पडून अन्य दोघांवर लक्ष द्यावे असा सल्ला आफ्रिदीने दिला आहे. कोहली, जवळपास २४,००० आंतरराष्ट्रीय धावांसह, त्याच्या फलंदाजीच्या पराक्रमाच्या शिखरावर कारकीर्द संपवेल असा अंदाजही आफ्रिदीने वर्तवला आहे.