बॉलीवूडचा ‘किंग खान’ शाहरुख सध्या आपल्या ‘रईस’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. देशातील विविध शहरात शाहरुख आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करत आहे. कधी ट्रेनमधून प्रवास करण्याचा फंडा शाहरुखने आजमावला, तर कधी बसमधून प्रवास करत आपल्या चित्रपटाचे प्रमोशन केले. शाहरुख क्रिकेटचा देखील तितकाच चाहता आहे. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा शाहरुख सह-मालक देखील आहे. कोलकाताच्या संघाने दोनवेळा स्पर्धेचे जेतेपद देखील पटकावले होते. चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतेच शाहरुखने एका स्पोर्ट्स कार्यक्रमात भाग घेतला होता. शाहरुखच्या नजरेत भारतीय संघातील कोणत्या खेळाडूंना तो आपल्या चित्रपटाच्या नावाची उपमा देऊ इच्छितो असे विचारले असता त्याने आपल्या हजरजबाबी वृत्तीने छान नावं सांगितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

शाहरुखला अश्विनबाबत विचारले असता तो म्हणाला की, अश्विन हा एक रहस्यमय व्यक्ती आहे. तो केव्हा काय करेल याचा नेम नसतो. तो खूप शांत स्वभावाचा व्यक्ती आहे. पण तो अचानकपणे असा काही बॉल टाकतो की फलंदाजाला धक्काच बसतो आणि फलंदाज विकेट गमावून बसतो. त्यामुळे मी अश्विनला ‘पहेली’ असे नाव देईन. यानंतर भारतीय संघाचा ओपनिंग बॅट्समन रोहित शर्मा याला ‘एसआरके’ने फलंदाजीचा ‘बादशहा’ असे संबोधले. रोहित शर्माच्या फलंदाजीच्या स्टाईलवर आपण फिदा असल्याचे शाहरुख म्हणाला. रोहित गोलंदाजांची ज्याप्रमाणे धुलाई करतो ते भन्नाट असतं. विराट कोहलीला तर शाहरुखने ‘डॉन’ म्हटलं, कोहली फलंदाजीसाठी मैदानात येतो तेव्हा त्याच्यात कमालीची दृढता दिसून येते. नेहमी जिंकण्याची इच्छाशक्ती आणि प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या चिंधड्या उडविण्याची ताकद पाहता विराट मला ‘डॉन’ वाटतो, असे शाहरुख म्हणाला. २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात जोगिंदर शर्मावर विश्वास दाखवून त्याला गोलंदाजी देणारा कॅप्टन कूल धोनी याला शाहरुखने आपल्या ‘बाजीगर’ या चित्रपटाची उपमा दिली. भारतीय संघाने या ओव्हरमध्ये जवळपास हातातून निसटणारा सामन्यात अखेरच्या क्षणी बाजी मारली होती. त्यामुळे धोनी ‘बाजीगर’ असल्याचे शाहरुखने म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahrukh khan named ms dhoni virat kohli r ashwin and rohit sharma after his films
First published on: 24-01-2017 at 13:45 IST