मराठी अभिनेता व लेखक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेता चिन्मय मांडलेकरने सोशल मीडियावर मुलाच्या नावाने झालेल्या ट्रोलिंगमुळे नुकताच मोठा निर्णय घेतला आहे. रविवारी ( २१ एप्रिल ) इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत चिन्मयने ‘मी यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही, या भूमिकेची रजा घेतो’ असं जाहीर केलं. अभिनेत्याच्या या निर्णयानंतर यासंदर्भात मराठी मनोरंजनविश्वातील कलाकारांसह त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. अनेकांनी हा निर्णय मागे घेण्याची विनंती त्याला केली आहे. यावर आता अभिनेता पुष्कर श्रोत्रीने माध्यमांशी संवाद साधताना आपलं मत मांडलं आहे.
पुष्कर श्रोत्री म्हणाला, “त्याने मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून चिन्मय मांडलेकर त्याच्या मुलावर वेगळे संस्कार करतोय का? तो भारतीय संस्कृतीमधलेच संस्कार करतोय. आजची परिस्थिती कशी आहे याचा सगळा विचार करूनच तो त्याचं संगोपन करतोय. त्याला वाईट गोष्टीपासून परावृत्त करतोय, त्याला चांगल्याच गोष्टी शिकवतोय. मग, नावाने काय फरक पडतो?”
हेही वाचा : निलेश साबळेने सांगितला राज ठाकरेंच्या घरी घडलेला ‘तो’ किस्सा; म्हणाला, “माझ्या कोणत्याही मिमिक्रीवर…”
“तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या मुलाच्या नावावरून त्याला ट्रोल करणार असाल, तर तुम्हाला इतिहास माहितीये का? ‘जहांगीर’ हे नाव का ठेवलं हे त्याने फार आधीच सांगितलेलं आहे. तुम्ही इतिहास चाचपडून बघा आणि तुमच्यामध्ये खरंच हिंमत असेल, तर तुमचा खरा चेहरा घेऊन समोर या. तुम्ही खोटी नावं, खोटी अकाऊंट्स बनवून ट्रोल करणार…तुम्हाला आम्ही किती महत्त्व द्यायचं?” असा सवाल उपस्थित करत पुष्कर श्रोत्रीने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. मराठी बातमीवाला या इन्स्टाग्राम पेजवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
हेही वाचा : मृणाल दुसानिसच्या गोंडस लेकीला पाहिलंत का? नाव ठेवलंय खूपच खास, पहिल्यांदाच सांगितला अर्थ
दरम्यान, चिन्मय मांडलेकरने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांच्या शिवराज अष्टक मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. आजवर या मालिकेतील एकूण पाच चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. चिन्मयने घेतलेल्या या निर्णयामुळे आता अष्टकातील उर्वरित चित्रपटांचं काय होणार? महाराजांची भूमिका कोण साकारणार? अशा कमेंट्स करत अभिनेत्याच्या चाहत्यांनी त्याला हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे.