पुणे : तिसऱ्या विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताची पदकाची पाटी कोरी राहिल्यानंतर आता चौथ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी भारतीय संघात आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. विश्वचषक स्पर्धेबरोबर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणीनंतर संघातील हे नाट्यमय बदल समोर आले आहेत. अनुभवी तिरंदाज अभिषेक वर्मा, ऑलिम्पियन अतानु दास यांना या संघात स्थान मिळालेले नाही. चार खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करणार असून, यातील तीन खेळाडू हे किशोरवयीन आहेत.
निवड चाचणीत सर्वोत्तम कामगिरी केल्यानंतर महिलांच्या रिकर्व्ह संघासाठी दीपिका कुमारी आणि अंकिता भकत यांच्यानंतर महाराष्ट्राच्या १५ वर्षीय गाथा खडके आणि शर्वरी शेंडे यांना संघात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे तिरंदाजी खेळात भारतीय संघात वरिष्ठ गटासाठी इतक्या लहान खेळाडूंना प्रथमच संधी मिळाली आहे.
गाथा आणि शर्वरी या दोघींनी यापूर्वी युवा आणि कॅडेट जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. मानांकन फेरीत दोघींनी दीपिका, अंकिता, भजन कौर, कोमलिका बारी अशा तगड्या अनुभवी खेळाडूंना मागे टाकून तब्बल ६८६ गुणांची कमाई करून अव्वल स्थान मिळविले होते. रिकर्व्हच्या ७० मीटरच्या प्रकारात ऑलिम्पिक (६९३) विक्रमाच्या जवळ जाणारी कामगिरी गाथाकडून झाली. ही सर्वात मोठी कामगिरी असून, या दोघींनी स्वत:ला सिद्ध करून एक पाऊल पुढे टाकले, अशी प्रतिक्रिया प्रशिक्षक रणजीत चामले यांनी व्यक्त केली. मात्र, एलिमिनेशन फेरीत अनुभवाने बाजी मारली. गाथा मूळ टेंभुर्णीची असली, तरी ती पुण्याच आर्चर अकादमी येथे रणजीत चामले आणि राम शिंदे यांच्याकडे प्रशिक्षण घेते. शर्वरी पिंपरी चिंचवडची असून, ती कुणाल तावरे यांच्याकडे मार्गदर्शन घेते.
दीपिका, अंकिता, गाथा आणि शर्वरी या चौघींचा संघ आता ८ ते १३ जुलैदरम्यान माद्रिद येथील चौथ्या विश्वचषक आणि ५ ते १२ सप्टेंबरदरम्यान ग्वांगझो येथे होणाऱ्या जागतिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करेल. पुरुषांच्या संघात अतानु दासला मागे टाकत २० वर्षीय राहुल सिंहने संघात स्थान मिळविले. नीरज चौहान, धीरज बोम्मादेवरा, राहुल सिंह आणि ४१ वर्षीय तरुणदीप राय असा भारतीय संघ राहील.
कम्पाऊंड विभागात मोठा धक्का
तिरंदाजी प्रकारात अलीकडच्या काळात भारताचे बलस्थान राहिलेल्या कम्पाऊंड संघात सर्वात मोठा बदल झाला असून, जागतिक क्रमवारीत सातव्या स्थानावर असलेल्या अभिषेक वर्मासह माजी जागतिक विजेता ओजस देवतळे आणि माजी जगज्जेती आदिती स्वामी तसेच या वर्षी दुसऱ्या टप्प्यात पदार्पणात सुवर्णपदक मिळविणारी मधुरा धामणगांवकर यांना वगळण्यात आले आहे. अमन सैनीने या प्रकारात तीन वर्षांनी पुनरागमन केले. त्याच्यापाठोपाठ प्रथमेश फुगेने संघात स्थान मिळविले. ऋषभ यादव आणि प्रियांश असे संघातील अन्य दोन सदस्य असतील. महिला संघात महाराष्ट्राची प्रीतिका प्रदीप ही १६ वर्षीय खेळाडू पदार्पण करेल. ज्योती सुरेखा वेन्नम, परनीत कौर, पृथिका प्रदीप, वीस वर्षीय तिकिथा तनीपर्थी असा महिला संघ राहील.
ऑलिम्पियन आणि अनुभवी खेळाडूंवर वर्चस्व राखणे खूप महत्त्वाचे आहे. निवड चाचणीत गाथा आणि शर्वरी दोघींची कामगिरी अनुभवी खेळाडूंपेक्षा चांगली राहिली. त्यांचे भविष्य उज्ज्वल आहे. किशोर वयातच त्यांना ही संधी मिळाल्यामुळे या स्पर्धेतील अनुभव त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.- रणजीत चामले, तिरंदाजी प्रशिक्षक.