अन्वय सावंत, लोकसत्ता
मुंबई : भारताकडे सलामीवीरांचे अनेक दर्जेदार पर्याय उपलब्ध असल्याने अनुभवी शिखर धवनला एकदिवसीय संघात पुनरागमन करणे अत्यंत अवघड जाईल, असे मत भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने व्यक्त केले. तसेच गंभीरने धवनला प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी धवनला भारतीय संघातून वगळण्यात आले आहे. धवन हा दशकभरापासून भारताच्या एकदिवसीय संघाचा प्रमुख सदस्य होता. मात्र, ३७ वर्षीय धवनला गेल्या काही काळात कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. त्याला गेल्या नऊपैकी आठ एकदिवसीय सामन्यांत धावांसाठी झगडावे लागले आहे. तो सहा वेळा एकेरी धावसंख्येवर बाद झाला आहे, तर दोन वेळा त्याला ३० धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. तसेच पॉवरप्लेच्या षटकांमध्ये त्याला आक्रमक शैलीत खेळ करण्यात अपयश आले आहे. त्यामुळे भारताने पुढील वर्षी होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकाचा विचार करून आता धवनपलीकडे बघण्यास सुरुवात केली आहे.
‘‘कोणत्याही खेळाडूसाठी संघाची दारे पूर्णपणे बंद होत नाहीत. मात्र, धवनला एकदिवसीय संघात पुनरागमन करणे अत्यंत अवघड जाईल असे मला वाटते. भारताकडे रोहित शर्मा, इशान किशन, शुभमन गिल आणि केएल राहुल असे सलामीवीरांचे दर्जेदार पर्याय उपलब्ध आहेत. त्यामुळे धवनला पुन्हा एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यासाठी विशेष कामगिरी करावी लागेल. त्याने इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामात दमदार कामगिरी करणे गरजेचे आहे. तसेच धवनने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये खेळणे आणि सातत्याने धावा करणेही आवश्यक आहे. तो सध्या प्रथमश्रेणी क्रिकेट खेळत नाही याचे मला आश्चर्य वाटते. त्याने देशांतर्गत स्पर्धामध्ये चमक दाखवल्यास निवड समितीला पुन्हा त्याच्याबाबत विचार करावा लागू शकेल,’’ असे गंभीर म्हणाला.
तसेच श्रीलंकेविरुद्धची मालिका भारतीय संघातील युवा खेळाडूंसाठी महत्त्वाची असेल, असेही गंभीरने नमूद केले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला ३ जानेवारीपासून सुरुवात होणार असून याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर करण्यात येईल.
रोहितनेच कर्णधारपद भूषवावे!
अष्टपैलू हार्दिक पंडय़ाची श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. तसेच त्याला एकदिवसीय संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारीही देण्यात आली आहे. भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा पुढील कर्णधार म्हणून हार्दिककडे पाहिले जात आहे. मात्र, पुढील वर्षी मायदेशात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत रोहित शर्मानेच भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवले पाहिजे, असे गंभीरला वाटते. ‘‘हार्दिकने कर्णधार म्हणून प्रभावित केले आहे. त्याने गुजरात टायटन्सला ‘आयपीएल’चे जेतेपद मिळवून दिले. त्यामुळे निवड समिती कर्णधारपदासाठी त्याचा नक्कीच विचार करू शकते. मात्र, एकदिवसीय विश्वचषकापर्यंत तरी रोहितनेच भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळावी. ‘आयसीसी’च्या केवळ एका स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे रोहितबाबत मत बनवणे योग्य ठरणार नाही. त्याने यापूर्वी कर्णधार म्हणून यशस्वी कामगिरी केली आहे,’’ असे गंभीरने नमूद केले.