Shikhar Dhawan Summoned by ED: भारताचा उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि रोहित शर्माचा सलामी जोडीदार शिखर धवनबाबत मोठी बातमी समोर येत आहे. शिखर धवनला ईडीने समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे. शिखर धवनला आज ईडीने चौकशीसाठी बोलावलं असून तो ईडी कार्यलयात पोहोचला आहे. पण नेमकं कारण काय आहे, जाणून घेऊया.

शिखर धवन हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. शिवाय तो विविध जाहिरातींच्या माध्यमातूनही चाहत्यांच्या भेटीला असतो. कायम चर्चेत असणारा शिखर धवनचे त्याच्या गर्लफ्रेंडबरोबरचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याचेही सोफी शाईन हिने पोस्ट करत शेअर केलं होतं. पण नुकत्याच आलेल्या माहितीनुसार धवन सध्या अडचणीत सापडला आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर शिखर धवनला ईडीने एका बेटिंग अॅपच्या जाहिरातीशी संबंधित प्रकरणात समन्स बजावले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, ही चौकशी 1xBet या ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित आहे, ज्यावर मनी लाँड्रिंगचे आरोप करण्यात आले होते.

वृत्तसंस्था पीटीआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली. सूत्रांनी सांगितलं की, 1xBet नावाच्या ‘बेकायदेशीर’ बेटिंग अॅपशी संबंधित या चौकशीचा भाग म्हणून संघीय तपास संस्था मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (पीएमएलए) त्याचा जबाब नोंदवला जाईल.

शिखर धवन काही जाहिरातींद्वारे या अ‍ॅपशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. चौकशीदरम्यान ईडीला त्याचे या अ‍ॅपशी असलेला संबंध जाणून घ्यायचा आहे. शिखर धवनने सोशल मीडियावर बेटिंग अॅप्सला प्रोत्साहन दिल्याचा आरोप तपासकर्त्यांनी केला आहे. ईडीने आता क्रिकेटपटूला याबाबतची त्याची भूमिका स्पष्ट करण्यासाठी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे.

ऑगस्ट २०२५ मध्ये, ईडीने माजी भारतीय क्रिकेटपटू सुरेश रैनाला ऑनलाइन बेटिंग प्लॅटफॉर्म 1xBet च्या चौकशीच्या संदर्भात समन्स बजावले होते. ही चौकशी बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्म आणि त्यांच्या सेलिब्रिटी प्रमोटर्सवरील कारवाईचा एक भाग आहे, ज्यामध्ये आधीच अनेक मोठमोठ्या नावांचा यात समावेश आहे.

गेल्या वर्षापासून, अनेक बॉलिवूड आणि दक्षिण भारतीय चित्रपट सेलिब्रेटी आणि क्रिकेटपटू बेकायदेशीर बेटिंग अॅप्सला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली चौकशीसाठी हजर राहिले आहेत. या यादीत विजय देवेराकोंडा, राणा दग्गुबती, प्रकाश राज, हरभजन सिंग, उर्वशी रौतेला आणि सुरेश रैना यांचा समावेश आहे.