Shreyas Iyer Discharged From Hospital: भारतीय संघातील स्टार फलंदाज आणि वनडे संघाचा नवा उपकर्णधार श्रेयस अय्यरबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियातील तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान झेल घेत असताना श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला आयसीयूमध्ये भरती करण्याची वेळ आली होती. मात्र तो आता ठीक असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान ॲलेक्स कॅरीचा झेल घेत असताना त्याच्या बरगड्यांना दुखापत होऊन अंतर्गत रक्तस्त्राव सुरू झाला होता. त्यामुळे त्याला तातडीने सिडनीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात आले आहेत. आता त्याची प्रकृती स्थिर असून तो विश्रांती करून लवकरच फिटनेस पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. .

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआयने) आपल्या निवेदनात म्हटले की, “आता त्याची (श्रेयसची) प्रकृती स्थिर आहे. तो सध्या फिटनेस पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे. “बीसीसीआयची वैद्यकीय टीम, सिडनी आणि भारतातील तज्ज्ञांसह, त्यांच्या (खेळाडूच्या) आरोग्याच्या सुधारणेवर खूश आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.”

यासह बीसीसीआयने श्रेयस अय्यरवर उपचार करणाऱ्या सिडनीतील डॉक्टरांचे देखील आभार मानले आहेत. डॉ. कौरोश हाघीगी आणि त्यांच्या संपूर्ण टीमसह डॉ. दीनशॉ पारदीवाला यांचे देखील आभार मानले आहेत. दुखापतीतून सावरला असला तरीदेखील श्रेयस अय्यर इतक्यात तरी भारतात परतणार नाही. त्याला पुढील उपचारांसाठी सिडनीत थांबावं लागणार आहे. ज्यावेळी तो पूर्णपणे फिट होईल तेव्हा तो भारतात येऊ शकेल. त्यामुळे तो आणखी काही दिवस क्रिकेटपासून दूर राहू शकतो. येत्या काही दिवसात दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यावर होणाऱ्या वनडे मालिकेतून श्रेयस अय्यरला विश्रांती दिली जाऊ शकते.