Shreyas Iyer Captaincy: आशिया चषक २०२५ स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात श्रेयस अय्यरला स्थान देण्यात आलेलं नाही. श्रेयस अय्यरने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी केली, असं असतानाही त्याला संघात स्थान न दिल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. आयपीएलमध्ये ६०० धावांचा पल्ला गाठणाऱ्या श्रेयस अय्यरला लवकरच पुनरागमनाची संधी मिळू शकते यासह मोठी जबाबदारी देखील मिळू शकते.
आशिया चषकासाठी श्रेयस अय्यरची निवड करण्यात आलेली नाही, पण लवकरच त्याला मोठी लॉटरी लागू शकते. येत्या काही दिवसात ऑस्ट्रेलिया अ संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यावर कसोटी आणि मर्यादीत षटकांच्या मालिका देखील होणार आहे. माध्यमातील वृत्तानुसार, या मालिकेसाठी श्रेयस अय्यरची भारतीय अ संघात संधी मिळू शकते. यासह कर्णधारपदाची जबाबदारी देखील मिळू शकते.
क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरकडे भारतीय अ संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. ऑस्ट्रेलिया अ संघाविरूद्ध होणाऱ्या मालिकेसाठी बीसीसीआयकडून भारतीय अ संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. श्रेयस अय्यरला या संघात स्थान मिळणार, हे जवळजवळ निश्चित आहे, पण बीसीसीआय त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
बीसीसीआयच्या सुत्राने क्रिकबझला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “भारतीय अ संघात श्रेयस अय्यरला स्थान दिले जाऊ शकते. सध्या तो दुलीप ट्रॉफी स्पर्धा खेळत आहे. रेड बॉल क्रिकेटसाठी त्याच्याकडे भारतीय अ संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.”
श्रेयस अय्यरने गेल्या काही महिन्यांपासून दमदार फलंदाजी केली आहे. देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएल स्पर्धेतही त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. आयपीएल २०२५ मध्ये फलंदाजी करताना त्याने ६०० हून अधिक धावा कुटल्या. सध्या तो बंगळुरूत सुरू असलेल्या दुलीप ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट झोन संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. या स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलमध्ये फलंदाजी करताना त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. पहिल्या डावात तो २५ धावा करत माघारी परतला. पण एका डावामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करता येणार नाही. कारण त्याने सातत्याने स्वत:ला सिद्ध केलं आहे.