इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाची तयारी सुरू आहे. सध्याच्या सर्व ८ संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्यास सांगण्यात आले आहे. आयपीएल २०२२पूर्वी एक मेगा लिलाव होणार आहे. आठ फ्रेंचायझी जास्तीत जास्त चार खेळाडूंनाच संघा ठेवू शकतात. एवढेच नव्हे, तर पुढील हंगामात १० संघ सहभागी होतील. दरम्यान, श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सच्या रिटेन्शन लिस्टमध्ये नसल्याचे बोलले जात आहे.

श्रेयसने २०१५ मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले आणि दिल्लीचे कर्णधारपदही सांभाळले. मात्र, श्रेयस अय्यरचे या संघाशी असलेले संबंध आता संपुष्टात येऊ शकतात, कारण दिल्ली संघ सध्याचा कर्णधार ऋषभ पंत, कगिसो रबाडा, पृथ्वी शॉ आणि अक्षर पटेल यांना कायम ठेवण्याचा विचार करत आहे.

हेही वाचा – IND vs NZ : “सूर्यकुमारला द्रविडसमोर हजर करा”, वसीम जाफरची मागणी; अक्षरची ‘ती’ चूक पकडली!

२६ वर्षीय अय्यरने अलीकडेच कसोटी पदार्पण केले आणि न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावले. त्याने १०५ धावांची दमदार खेळी केली. त्याने दिल्ली संघाचे नेतृत्व केले आहे. मात्र नंतर दुखापतीमुळे त्याला लीगमधून माघार घ्यावी लागली आणि ऋषभ पंतने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. टेलिग्राफच्या वृत्तानुसार, मुंबई इंडियन्स संघात श्रेयस अय्यरचा समावेश करण्याचा विचार आहे. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद रोहित शर्माकडे आहे. विशेष म्हणजे रोहित आणि श्रेयस अय्यर हे दोघेही देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व करतात.

पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबईला लिलावात आपले प्रमुख खेळाडू कायम ठेवणे कठीण जाईल, परंतु फलंदाजी क्रम मजबूत करण्यासाठी श्रेयस अय्यरला जोडले जाऊ शकते. अहमदाबाद आणि लखनऊ हे दोन नवीन संघ खेळताना दिसतील.