Shreyas Iyer, Asia Cup 2025: आगामी आशिया चषक २०२५ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी येत्या १९ ऑगस्टला भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. भारतीय संघ पहिल्यांदाच सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली आशिया चषक स्पर्धा खेळताना दिसून येणार आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव कोणत्या खेळाडूंना संधी देणार? अशी चर्चा रंगायला सुरूवात झाली आहे. आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी करणारा श्रेयस अय्यर भारतीय टी-२० संघात पुनरागमन करू शकतो, अशी चिन्ह आहेत. पण माध्यमातील वृत्तानुसार त्याला आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

श्रेयस अय्यरने आयपीएल २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्जला अंतिम फेरीत पोहोचवलं होतं. श्रेयसने या हंगामात फलंदाजी करताना धावांचा पाऊस पाडला होता. तर कर्णधार म्हणूनही तो सुपरहिट ठरला होता. त्याआधी झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत त्याने धावांचा पाऊस पाडला होता. यासह देशांतर्गत क्रिकेटमध्येही त्याने धावांचा पाऊस पाडला आहे.

श्रेयस अय्यरला आशिया चषकात संधी मिळणार का?

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आशिया चषक स्पर्धेसाठी श्रेयस अय्यरला भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. वनडे संघात पुनरागमन करणाऱ्या श्रेयस अय्यरला अजूनही कसोटी आणि टी-२० संघात पुनरागमन करता आलेलं नाही. श्रेयस अय्यर २०२३ मध्ये आपला शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर तो टी-२० संघात पुनरागमन करू शकलेला नाही. भारतीय टी-२० संघातील मध्यक्रमात फलंदाजी करण्यासाठी तिलक वर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे प्रबळ दावेदार आहेत. त्यामुळे श्रेयसला संधी मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.

आयपीएल २०२५ स्पर्धेत दमदार कामगिरी

गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स संघाला जेतेपद मिळवून देणारा श्रेयस अय्यर आयपीएल २०२५ स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. त्याच्या नेतृत्वाखाली खेळताना पंजाब किंग्ज संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. अंतिम फेरीत पंजाबला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. श्रेयसने या हंगामातील १७ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना ५० च्या दमदार सरासरीने ६०४ धावा केल्या होत्या.

श्रेयस अय्यरसह भारताचा युवा सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वालला देखील भारतीय टी-२० संघात स्थान मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. यशस्वीला कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे त्याला आशिया चषकासाठी भारतीय संघात स्थान मिळणं कठीण आहे. यशस्वीने २३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १६४ च्या स्ट्राईक रेटने ७२३ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ५ अर्धशतकं झळकावली आहेत.