IND vs ENG 2nd Test: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना बर्मिंघमच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातही भारताचा कर्णधार शुबमन गिलची बॅट चांगलीच तळपली आहे. शुबमन गिलने या सामन्यातील पहिल्या डावात १५० धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी फलंदाजी करताना त्याने आपलं शतक पूर्ण केल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना पहिल्याच सत्रात १५० धावांचा पल्ला गाठला. यासह त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.

या मालिकेतील दोन्ही साम्यांमध्ये गिलच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने दमदार शतकी खेळी केली होती. आता दुसऱ्या डावात त्याने १५० धावांचा पल्ला गाठला आहे. पहिल्या दिवशी १९९ चेंडूंचा सामना करत त्याने आपलं शतक पूर्ण केलं. तर दुसऱ्या दिवसातील पहिल्याच सत्रात त्याने २६३ चेंडूंचा सामना करत आपल्या १५० धावा पूर्ण केल्या. यासह तो इंग्लंडविरूद्ध इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना १५० धावांचा पल्ला गाठणारा दुसराच भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी मोहम्मद अझरूद्दीन यांनी इंग्लंडमध्ये इंग्लंडविरूद्ध खेळताना शतक झळकावलं होतं.

असा रेकॉर्ड करणारा ठरला दुसराच भारतीय कर्णधार

शुबमन गिलने पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये १५० धावांचा पल्ला गाठला आहे. गेल्या सामन्यातही तो १५० धावांच्या जवळ पोहोचला होता. पण, तो बाद होऊन माघारी परतला होता. मात्र, या डावात त्याने १५० धावांचा डोंगर यशस्वीरित्या सर केला आहे. यासह तो इंग्लंडमध्ये इंग्लंडविरूद्ध खेळताना १५० धावांची खेळी करणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी मोहम्मद अझरूद्दीन यांनी १९९० मध्ये ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर फलंदाजी करताना १७९ धावांची खेळी केली होती. त्यावेळी ते असा कारनामा करणारे पहिलेच भारतीय कर्णधार ठरले होते.

भारतीय संघ मजबूत स्थितीत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. भारतीय संघाला सुरूवातीला मोठा धक्का बसला. केएल राहुल स्वस्तात माघारी परतला. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि करूण नायरने मिळून भारताचा डाव सावरला. भारताकडून यशस्वी जैस्वालने ८७ धावांची दमदार खेळी केली. तर करूण नायर ३१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर ऋषभ पंतने २५ धावांची खेळी केली. नितीश कुमार रेड्डी १ धाव करत माघारी परतला. भारताकडून गिलने १५० पार तर जडेजा शतकाच्या अगदी जवळ आहे. भारतीय संघाने ४०० धावांचा पल्ला गाठला आहे.