Shubman Gill Jadeja and Sundar Refuses Ben Stokes Handshake: मँचेस्टर कसोटी सामना अनिर्णित राहिल्यानंतर शुबमन गिलने रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदरचं कौतुक केलं. कसोटी सामना अनिर्णित करण्याच्या प्रस्तावाला भारताने नकार का दिला, हे त्याने सांगितलं.
भारताच्या फलंदाजांनी कमालीची फटकेबाजी करत इंग्लंडकडून विजयाचा घास हिरावला आणि सामना अनिर्णित ठेवला. भारताच्या ४ फलंदाजांनी सलग पाच सत्र फलंदाजी करत यजमान संघाच्या गोलंदाजांना घाम फोडला. गिल आणि राहुलच्या १८८ धावांच्या भागीदारीनंतर सुंदर आणि जडेजा यांनी शतकं झळकावत २०० अधिक धावांची भागीदारी रचली. पण या सामन्यादरम्यान जडेजा-सुंदरने इंग्लंडच्या प्रस्तावाला नकार का दिला, याचं कारण सांगितलं आहे.
सामना संपल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिलने दोन्ही फलंदाजांचं कौतुक केले. दोन्ही फलंदाजांनी बेन स्टोक्सशी सामना बरोबरीत आणण्यासाठी हस्तांदोलन का केलं नाही हे देखील त्याने स्पष्ट केलं.
सामन्यानंतरच्या प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये शुबमन गिल म्हणाला, “फलंदाजांच्या कामगिरीमुळे मी आनंदी आहे. गेल्या काही दिवसांपासून आमच्यावर खूप दडपण होतं. पाचव्या दिवशी फलंदाजी करणं सोप नसतं, खेळपट्टीवर काहीतरी बदल झालेले असतात आणि प्रत्येक चेंडू महत्त्वाचा असतो. आम्हाला प्रत्येक चेंडू खेळून सामना शेवटपर्यंत न्यायचा होता. आम्ही याबद्दलच चर्चा केली होती.”
१३८ व्या षटकानंतर, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स सामना बरोबरीत आणण्यासाठी जडेजा आणि सुंदर यांच्याकडे हस्तांदोलन करण्यासाठी गेला. दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या या प्रस्तावाला नकार दिला. याबद्दल शुबमन गिल म्हणाला की, “जडेजा आणि सुंदर यांनी उत्तम फलंदाजी केली होती. दोघेही नव्वदीच्या घरात होते आणि शतकाचे हकदार होते. प्रत्येक सामना शेवटच्या दिवशी शेवटच्या सत्रापर्यंत जात आहे. प्रत्येक सामन्यात काही ना काही शिकायला मिळतं. प्रत्येक कसोटी सामना आपल्याला नवीन काहीतरी शिकवून जातो.”
इंग्लंडने पहिल्या डावात ६६९ धावांचा डोंगर उभारत ३११ धावांची आघाडी घेतली होती. प्रत्युत्तरात खातंही न उघडता भारताने सलग २ विकेट्स गमावले होते. यानंतर शुबमन गिल आणि केएल राहुल यांनी संघाचा डाव सावरला आणि १८८ धावांची उत्कृष्ट भागीदारी रचली. राहुल ९० धावांवर बाद झाल्याने त्याचं शतक हुकलं. मात्र गिलने १०३ धावांची खेळी करत मालिकेतील चौथं शतक झळकावलं. यानंतर सुंदर आणि जडेजाने इंग्लंडच्या विजयाच्या आशा धुळीस मिळवत सामना अनिर्णित करण्यात मोठी भूमिका बजावली.