वृत्तसंस्था, लंडन
फलंदाजीदरम्यान पहिल्या डावात लयीत असलेला ऋषभ पंत धावचीत होणे हा लॉर्ड्स कसोटीला कलाटणी देणारा क्षण होता. त्याचा धाव घेण्याचा अंदाज चुकला आणि तेच आम्हाला सर्वाधिक महागात पडल्याची कबुली भारताचा कर्णधार शुभमन गिलने पत्रकार परिषदेत दिली.
पाचव्या दिवशी अखेरच्या सत्रापर्यंत रंगलेल्या सामन्यात भारताला अगदी अखेरच्या क्षणी २२ धावांनी पराभव पत्करावा लागला. त्यानंतर प्रतिस्पर्धी कर्णधारासह क्रिकेट जाणकारांनी पहिल्या डावात पंतच्या धावबाद होण्याकडे बोट दाखवले.
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार गिलनेही ही चूक झाल्याचे म्हटले. ‘‘भारतीय संघ तेव्हा पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. ऋषभ बाद झाल्यानंतर आमचे सामन्यावरील वर्चस्व कमी झाले. त्यामुळेच सामन्याला कलाटणी देणारा हा क्षण मानता येईल. पहिल्या डावात ८०-९० धावांची आघाडी मिळाली असती, तरी खूप फरक पडला असता. पाचव्या दिवशी खेळपट्टीवर १५० ते २०० धावांचा पाठलाग कठीण असल्याचा अंदाज आम्हाला आला होता,’’ असे गिल म्हणाला.
राहुलला लवकर शतक पूर्ण करता यावे यासाठी पंत धावला अशी टीका करण्यात काहीच अर्थ नाही. वैयक्तिक कामगिरीपेक्षा आपण संघाच्या हिताविषयी बोलू. राहुलच्या शतकासाठी धाव घेण्याची घाई करण्यात आली नाही, तर त्या क्षणी धाव घेण्याच्या अंदाजातच चूक झाली, असेही गिल म्हणाला.
गिलने या वेळी रवींद्र जडेजा आणि तळातील फलंदाजांचे कौतुक केले. विजयासाठी १९३ धावांचा पाठलाग करताना ८ बाद ११२ अशी स्थिती असताना जडेजाने ज्या पद्धतीने जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराजला हाताशी घेऊन फलंदाजी केली, त्याला तोड नाही. या दोघांच्या साथीने जडेजाने तब्बल तीन तास झुंज दिली. हे फारच कौतुकास्पद होते,’’ असे गिलने नमूद केले.
गिलने जडेजाचे विशेष कौतुक केले. ‘‘तो संघातील अनुभवी खेळाडू आहे. त्याला वेगळे काहीही सांगण्याची गरज नव्हती. अनुभव, गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण या चारही आघाड्यांवर त्याने आपली प्रगल्भता यापूर्वीच दाखवून दिली आहे. या डावात त्याने ज्या प्रकारे संयम दाखवला तो खरोखरच जबरदस्त होता,’’ असे गिलने सांगितले.
भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांना मंगळवारी किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेण्याची संधी मिळाली. ब्रिटनचे राजे असलेल्या चार्ल्स यांनी क्लेरेन्स हाऊस येथे भारतीय खेळाडूंशी दीर्घकाळ संवाद साधला. या वेळी त्यांनी लॉर्ड्स कसोटीत मोहम्मद सिराज ज्या पद्धतीने बाद झाला, ते दुर्दैवी होते, असे आवर्जुन सांगितले.