नवी दिल्ली : भारताच्या १२ पैकी सहा बॅडमिंटनपटूंना जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत खेळण्यापासून रोखण्यात आले. प्रशासकीय चुकीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ क्रीडा महासंघाने म्हटले आहे.
विद्यापीठ स्पर्धा जर्मनीत सुरू असून, भारताने बॅडमिंटन मिश्र सांघिक प्रकारात कांस्यपदक मिळवले आहे. या स्पर्धेसाठी भारताने १२ बॅडमिंटनपटूंना पाठवले होते. परंतु, १६ जुलै रोजी झालेल्या व्यवस्थापकांच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी सर्व खेळाडूंची नावे योग्य पद्धतीने सादर न केल्यामुळे सहा खेळाडूंना स्पर्धेतील पुढील सहभागापासून रोखण्यात आले आहे.
वगळण्यात आलेल्या खेळाडूंनी समाजमाध्यमांचा वापर करुन आपल्यावर झालेला अन्याय सर्वासमोर आणण्याचा प्रयत्न केला असून, भारतीय विद्यापीठ संघटनेने (एआययू) या घटनेची कबुली दिली आहे. ‘‘ही चूक नाही, तर आमच्या संघ अधिकाऱ्यांनी खेळाडूंच्या कारकीर्दीशी केलेला खेळ आहे,’’ अशी संतप्त भावना मुंबई विद्यापीठाची विद्यार्थी असलेल्या अलिशा खानने व्यक्त केली.
व्यवस्थापकांच्या बैठकीला ‘एआययू’चे बी. व्ही. राव आणि अजित मोहन हे अधिकारी उपस्थित होते. ‘एआययू’चे सचिव डॉ. पंकज मित्तल यांनी या संदर्भात स्पष्ट भाष्य केले नाही. मात्र, घटनेची दखल घेण्यात आली असून, या प्रकरणाची चौकशी केली जात असल्याचे सांगितले.
व्यवस्थापकांच्या बैठकीत भारताच्या सर्व १२ खेळाडूंची यादी दिल्यानंतर ती काळजीपूर्वक वाचणे, यातील कुठले नाव चुकले किंवा कुठले वगळले, तसेच जायबंदी खेळाडूंची तपासणी करुन नावे निश्चित करणे ही जबाबदारी त्या अधिकाऱ्यांची होती. त्यांनी याला फारसे गांभीर्याने घेतले नाही, अशी टीका केली जात आहे. यादीत कुठला खेळाडू एकेरी, दुहेरी, मिश्र दुहेरी खेळणार आहे याचा साधा उल्लेखही योग्य प्रकारे करण्यात आला नव्हता.
सनीथ दयानंद, सतीश कुमार करुणाकरन, देविका सिहाग, तस्निम मीर, वर्षिनी विश्वनाथ श्री आणि वैष्णवी खडकेकर हे सहा जण मिश्र संघात सहभागी झाले होते. या संघाने बाद फेरीत अमेरिका आणि उपांत्यपूर्व फेरीत मलेशियाला त्यांनी पराभूत केले. उपांत्य फेरीत तैपेइकडून पराभव पत्करावा लागल्याने या संघाला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
निवडलेल्या १२ खेळाडूंमध्ये रोहन कुमार, दर्शन पुजारी, आदिती भट, अभिनाश मोहंती, विराज कुवळे आणि अलिशा खान यांचाही समावेश होता. मात्र, त्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही. यातील दर्शनने भारतीय बॅडमिंटन संघटनेला पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली.
जर्सीच्या खोटेपणाबद्दल दंड
वगळण्यात आलेल्या दर्शन पुजारीने भारतीय बॅडमिंटन संघटनेला लिहिलेल्या पत्रात भारतीय संघ व्यवस्थपानला एक हजार युरोचा दंड झाल्याचेही सूचित केले आहे. जर्सीवर केवळ खेळाडूंचे आडनाव छापणे अनिवार्य होते. यांनी खेळाडूंची पूर्ण नावे छापली आणि देशाचे नावही योग्यरित्या लिहिलेले नव्हते. यासाठी हा दंड करण्यात आला. त्यानंतर उपांत्य फेरीत खेळाडूंना योग्य जर्सी मिळाल्या, अशी माहिती त्याने दिली.
हे केवळ गैरव्यवस्थापन नाही. आमची कारकीर्द धोक्यात आणण्याचा प्रकार आहे. आम्हाला उत्तर हवे आहे. आम्हाला स्पर्धेत सहभागी होण्याचा साधा अधिकारही यामुळे गमवावा लागला आहे. – अलिशा खान, वगळण्यात आलेली खेळाडू.