Smriti Mandhana World Record: भारताची स्टार फलंदाज स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलिया वनडे मालिकेत वादळी फटकेबाजी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. स्मृतीने या वनडे मालिकेत सलग दोन शतकं करत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. एकदिवसीय विश्वचषकापूर्वी स्मृती मानधनाचा कमालीचा फॉर्म भारतासाठी आनंदाची गोष्ट आहे. मानधनाने या खेळीदरम्यान शानदार कामगिरीनंतर मोठा वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे.

स्मृती मानधनाने ऑस्ट्रेलियाविरूद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात १२५ धावांची खेळी केली. या सामन्यात ४१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला ४३ धावांनी पराभव पत्करावा लागला, परंतु मानधनाने महिला एकदिवसीय फॉरमॅटमध्ये एक मोठा विक्रम नावे केला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत, स्मृती मानधनाने तीन सामन्यांमध्ये ३०० धावा केल्या. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील तिच्या शतकासह, ती महिला एकदिवसीय फॉरमॅटमध्ये सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक शतकं करणारी खेळाडू बनली.

स्मृती मानधनाने या बाबतीत न्यूझीलंड महिला संघाची दिग्गज खेळाडू सुझी बेट्सचा विक्रम मोडला आहे, तिने महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये सलामीवीर म्हणून एकूण १२ शतकी डाव खेळले आहेत. त्याचप्रमाणे, स्मृती मानधना आता तिच्या एकदिवसीय कारकिर्दीच्या १०८ व्या सामन्यात सलामीवीर फलंदाज म्हणून १३ शतकं झळकावून या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे.

महिला एकदिवसीय सामन्यात सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतकें झळकावणारे खेळाडू

स्मृती मानधना (भारत) – १३ शतकं

सुझी बेट्स (न्यूझीलंड) – १२ शतकं

टॅमी ब्यूमोंट (इंग्लंड) – १२ शतकं

चार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड) – ९ शतकं

हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज) – ९ शतकं

स्मृती मानधनाला आता ३० सप्टेंबरपासून भारताच्या यजमानपदाखाली सुरू होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकात मेग लॅनिंगचा विक्रम मोडण्याची संधी असेल, ज्यामध्ये ती महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकावणारी खेळाडू म्हणून पहिल्या स्थानावर पोहोचू शकते. स्मृती मानधना सध्या १३ शतकांसह सुझी बेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे, तर मेग लॅनिंग १५ शतकांसह अव्वल स्थानावर आहे.