पुरुषांच्या वार्षिक संघात स्थान मिळवण्यात भारतीय खेळाडू अपयशी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुबई : भारताची सलामीवीर स्मृती मानधनाने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या वार्षिक ट्वेन्टी-२० संघात स्थान मिळवले आहे. परंतु पुरुष संघात एकाही भारतीय क्रिकेटपटूला स्थान मिळवता आलेले नाही.

ट्वेन्टी-२० प्रकारात २०२१ या वर्षांत ३१.८७च्या सरासरीने एकूण २५५ धावा काढणारी स्मृती भारताचे उपकर्णधारपदही सांभाळते आहे. २५ वर्षीय स्मृतीने गतवर्षी नऊ सामन्यांत दोन अर्धशतके झळकावताना १३१.४४चा स्ट्राइक रेट राखला आहे. महिला संघात एकमेव भारतीय खेळाडू असली, तरी इंग्लंडच्या खेळाडूंचा या संघात भरणा पाहायला मिळाला. इंग्लंडच्याच नॅट शिव्हरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

पुरुष संघात स्थान मिळवण्यात भारतीय खेळाडू अपयशी ठरले असले तरी पाकिस्तानच्या तीन खेळाडूंचा समावेश आहे. बाबर आझमकडे संघाचे कर्णधारपद दिले आहे, तर मोहम्मद रिझवान आणि शहीद आफ्रिदी हे ट्वेन्टी-२० विश्वचषक गाजवणारे अन्य दोन खेळाडू संघात आहेत. ऑस्ट्रेलियाच्या विश्वविजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणारा अष्टपैलू मिचेल मार्श आणि वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडसुद्धा या संघात आहेत. याशिवाय एडिन मार्करम, डेव्हिड मिलर आणि ताबारेझ शाम्सी या तिघांनी संघात स्थान मिळवले आहे. इंग्लंडच्या जोस बटलरकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

महिला संघ :

स्मृती मानधना (भारत), टॅमी ब्युमाँट (इंग्लंड), डॅनी वॅट (इंग्लंड), गॅबी लेविस (आर्यलड), कर्णधार : नॅट शिव्हर (इंग्लंड), एमी जोन्स (इंग्लंड), लॉरा वोलव्हर्ट (दक्षिण आफ्रिका), मारिझाने कॅप (दक्षिण आफ्रिका), सोफी एक्लेस्टोन (इंग्लंड), लॉरिन फिरी (झिम्बाब्वे), शबनिम इस्माईल (दक्षिण आफ्रिका).

पुरुष संघ :

जोस बटलर (इंग्लंड), मोहम्मद रिझवान (पाकिस्तान), कर्णधार : बाबर आझम (पाकिस्तान), एडिन मार्करम (दक्षिण आफ्रिका), मिचेल मार्श (ऑस्ट्रेलिया), डेव्हिड मिलर (दक्षिण आफ्रिका), ताबारेझ शाम्सी (दक्षिण आफ्रिका), जोश हेझलवूड (ऑस्ट्रेलिया), वािनदू हसरंगा (श्रीलंका), मुस्ताफिझूर रेहमान (बांगलादेश), शाहीन आफ्रिदी (पाकिस्तान).

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smriti mandhana named in icc t20i women s team of the year zws
First published on: 20-01-2022 at 03:21 IST