Smriti Mandhana Biography Education, Career, Net Worth, Family, Records & Achievements 2025: भारतात आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघ पहिली जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्यापासून एक पाऊल दूर आहे. भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करणाऱ्या स्मृती मानधनाची तुलना माजी फलंदाज मिताली राजसोबत केली जाते. याच वर्ल्डकप स्पर्धेत तिने भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम आपल्या नावावर केला. दरम्यान स्मृती मानधनाचा क्रिकेट प्रवास कसा सुरू झाला? जाणून घ्या.

सांगली एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मृती मानधनाचा जन्म १८ जुलै १९९६ रोजी मुंबईत झाला. त्यानंतर तिचे कुटुंब सांगलीत स्थलांतरित झाले. क्रिकेटच्या पंढरीत जन्मलेल्या स्मृती मानधनाचा क्रिकेटचा प्रवास सांगलीत सुरू झाला. स्मृतीचे वडील श्रीनिवास हे देखील क्रिकेट खेळायचे. सांगलीत जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये त्यांनी आपल्या खेळाचा ठसा उमटवला. भाऊ श्रावण देखील क्रिकेट खेळायचा. लहानपणापासूनच स्मृतीवर क्रिकेटचे संस्कार होत होते. त्यामुळे तिला देखील क्रिकेट खेळायची आवड निर्माण झाली.

डावखुऱ्या हाताची फलंदाज असलेल्या स्मृतीला वयाच्या नवव्या वर्षी महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर तिला महाराष्ट्राकडून १९ वर्षांखालील संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी देखील मिळाली. २०१३ मध्ये तिला भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. वयाच्या १६ व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या स्मृतीने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात ३९ धावांची दमदार खेळी केली. काही दिवसांनंतर तिला वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली.

राहुल द्रविडच्या स्वाक्षरीच्या बॅटने झळकावलं द्विशतक

स्मृतीने राहुल द्रविड यांची स्वाक्षरी असलेल्या बॅटने १९ वर्षांखालील एकदिवसीय सामन्यात दमदार द्विशतकी खेळी केली होती. यासह ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये द्विशतकी खेळी करणारी ती पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली. २०१४ मध्ये तिला भारतीय कसोटी संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावून तिने आपला दर्जा आणखी मजबूत केला.

भारतीय संघाने २०१७ मध्ये झालेल्या महिला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला होता. या स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचवण्यात स्मृतीने मोलाची भूमिका बजावली होती. २०१८ मध्ये तिला आयसीसी महिला क्रिकेटपटू ऑफ द इअर आणि एकदिवसीय क्रिकेटर ऑफ द इअर हा पुरस्कार मिळाला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आजवर एकही ट्रॉफी जिंकली नव्हती. पण वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत तिने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचं प्रतिनिधित्व करताना पहिली ट्रॉफी जिंकून दिली. आता स्मृतीला खेळताना पाहून महिला गावातील महिला क्रिकेटपटूंनाही प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. लाखो लोकांसाठी आदर्श म्हणून तिने क्रिकेटपटूंच्या नवीन पिढीला प्रेरणा दिली आहे.