आतापर्यंत संघाला त्यांनी बरेच विजय मिळवून दिले आहे. पण वय, तंदुरुस्ती व फॉर्म पाहता क्रिकेट जगताला रामराम ठोकण्याची वेळ काही खेळाडूंवर येऊन ठेपली आहे आणि यासाठी ट्वेन्टी-२० विश्वचषकासारखे चांगले व्यासपीठ उपलब्धही झाले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच संघांतील काही खेळाडूंचा हा शेवटचा विश्वचषक ठरू शकतो.

भारत हा या विश्वचषकाचा प्रबळ दावेदार समजला जात आहे. पण भारतीय संघातील किमान चार खेळाडू तरी पुढील विश्वचषकात खेळू शकणार नाहीत, अशी चिन्हे आहेत. कर्णधार महेंद्रसिंग धोनीने भारताला पहिला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकवून दिला. त्यानंतर क्रिकेट जगतामध्ये यशस्वी कर्णधार म्हणून धोनीने आपली ओळख निर्माण केली. पण आता काही दिवसांपासून धोनीची तंदुरुस्ती पाहता त्याचा हा शेवटचा विश्वचषक असल्याचे म्हटले जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्याने आपल्या लौकिकाला साजेशी अशी मोठी खेळीही साकारलेली नाही. त्यामुळे या विश्चषकाची देशाला भेट देऊन धोनी ट्वेन्टी-२० क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी यशस्वी लढा देऊन जिगरबाज युवराज सिंग पुन्हा एकदा क्रिकेटच्या रणांगणात दाखल झाला आहे. पहिल्यासारखा त्याचा फॉर्म दिसत नसला तरी आपल्या जिद्दीच्या जोरावर तो चांगली अष्टपैलू कामगिरी करताना दिसत आहे. पण तो दोन वर्षे सातत्याने ट्वेन्टी-२० क्रिकेट खेळून पुढच्या विश्वचषकात सहभागी होईल, याची शक्यता फारच कमी दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्जमध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली मध्यमगती गोलंदाज आशीष नेहरा चांगला फॉर्मात आला. भारतीय संघात निवड झाल्यावर त्याने सातत्याने चांगली कामगिरी केली असली तरी तो पुढच्या विश्वचषकात खेळेल, असे मात्र वाटत नाही. फिरकीपटू हरभजन सिंग विश्वचषकाच्या संभाव्य संघात असला तरी तो अकरा सदस्यीय संघात खेळण्याची शक्यता कमीच दिसते. त्याचबरोबर हरभजनला आर. अश्विनसारखा चांगला पर्याय उपलब्ध असल्याने तो पुढच्या विश्वचषकात दिसण्याची शक्यता फारच कमी आहे.

ऑस्ट्रेलियाच्या संघाचा विचार केला तर अष्टपैलू शेन वॉटसनसाठी हा अखेरचा विश्वचषक असणार आहे. वाढते वय आणि ऑस्ट्रेलियाच्या निवड समितीचा व्यावसायिक विचार पाहता, वॉटसन जास्त काळ ऑस्ट्रेलियाच्या संघात दिसेल, असे वाटत नाही. त्याचबरोबर धडाकेबाज सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, यष्टिरक्षक पीटर नेव्हिल, अष्टपैलू जॉन हॅस्टिंग यांच्यासाठी हा अखेरचा विश्वचषक असू शकतो.

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला गेल्या काही महिन्यांपासून दुखापती होत आहेत, त्याचबरोबर वय आणि तंदुरुस्ती पाहता त्याचा हा अखेरचा विश्वचषक असेल. या विश्वचषकासाठीच्या त्यांच्या संघात कर्णधार फॅफ डय़ू प्लेसिस, हशिम अमला, ए बी डी’व्हिलियर्स, इम्रान ताहिर, फरहान बेहराडिन, आरोन फँगिसो आणि डेव्हिड वीईस यांनी तिशी ओलांडलेली आहे. त्यामुळे यांच्यापैकी बहुतांशी खेळाडू पुढील विश्वचषकात दिसणार नाहीत.

पाकिस्तानच्या संघाचा विचार केला तर कर्णधार शाहिद आफ्रिदीचे वय नेहमीच चर्चेचा विषय ठरले. पण सध्या त्याने ३६ वर्षे पूर्ण केली आहेत. या वेळी काही गोष्टींचा विचार करून त्याच्याकडे कर्णधारपद सुपूर्द करण्यात आले आहे. त्यामुळे विश्वचषकानंतर तो पाकिस्तानच्या संघात दिसेलच, हे सांगता येत नाही. वेगवान गोलंदाज मोहम्मद सामीही ३५ वर्षांचा आहे, त्यामुळे त्याच्यासाठी हा अखेरचा विश्वचषक ठरू शकतो. मोहम्मद हफिझ आणि शोएब मलिक यांनीही वयाची तिशी ओलांडली असल्याने त्यांना पुढच्या विश्वचषकात संधी मिळणे, कठीणच दिसत आहे.

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाचा हा अखेरचा विश्वचषक असेल. या विश्वचषकापूर्वीच तो दुखापतीने ग्रासला आहे. या विश्वचषकात तो किती सामने खेळेल, याबाबत साशंकता आहे. सलामीवीर तिलकरत्ने दिलशानचादेखील हा शेवटचा विश्वचषक असू शकतो.

वेस्ट इंडिजच्या संघातील बऱ्याच खेळाडूंचा हा अखेरचा विश्वचषक असू शकतो. धडाकेबाज सलामीवीर ख्रिस गेल सध्या ३६ वर्षांचा आहे, त्यामुळे तो पुढील विश्वचषकात खेळेल, असे चिन्ह दिसत नाही. सॅम्युअल बद्री आणि सुलेमान बेन हे दोघेही ३४ वर्षांचे आहेत. त्याचबरोबर कर्णधार डॅरेन सॅमी आणि अष्टपैलू ड्वेन ब्राव्हो हे ३२ वर्षांचे आहेत. त्यामुळे यापुढे या चौघांनी कामगिरीत सातत्य राखले नाही तर त्यांना पुढच्या विश्वचषकात सहभागी होता येणार नाही. त्याचबरोबर त्यांच्या वयाचा मुद्दाही निवड समितीकडून उपस्थित केला जाऊ शकतो.

विश्वचषकाच्या साखळी फेरीला मंगळवारपासून सुरुवात होईल. काही खेळाडूंना हा आपला अखेरचा विश्वचषक असल्याची कुणकुण नक्कीच लागलेली असेल. त्यामुळे आपल्या कारकीर्दीतील अंतिम विश्वचषकात हे खेळाडू कशी कामगिरी करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल.