क्रिकेट विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुली याने बुधवारी BCCI चे अध्यक्षपद स्वीकारले. BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची चर्चा होती. मात्र १४ ऑक्टोबर रोजी केवळ सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे BCCI च्या अध्यक्षपदी गांगुली विराजमान होणार हे निश्चित झालं होतं. त्यानुसार आज सौरव गांगुलीने BCCI च्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली.
It’s official – @SGanguly99 formally elected as the President of BCCI pic.twitter.com/Ln1VkCTyIW
— BCCI (@BCCI) October 23, 2019
सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ आज संपला. त्यामुळे आजच सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात आली आणि त्याची बिनविरोध नियुक्ती करण्यात आली. त्याच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभाही आजच होणार आहे. गांगुलीसोबतच भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह याने BCCI च्या सचिवपदाचा आणि BCCI चे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ यांनी BCCI च्या कोषाध्यक्षपदाचा पराभव स्वीकारला. त्यांचीही निवड बिनविरोध झाली.
BCCI ची वार्षिक सर्वसाधारण सभेतील निवडणूक बिनविरोध पार पडावी, यासाठी विविध राज्य संघटनांनी मुंबईत एक अनौपचारिक बैठक घेतली होती. त्यात अध्यक्षपदासाठी भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाची चर्चा होती. पण या पदासाठी अर्ज करण्याच्या मुदतीत केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. त्यामुळे कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याने त्याचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला होता.