बंगळूरु : कर्णधार ऋषभ पंतचे (१७) स्पर्धात्मक क्रिकेटमधील पुनरागमन अपयशी ठरले. तसेच भारत ‘अ’ संघाच्या अन्य फलंदाजांनीही हलगर्जीपणे खेळ केल्यामुळे पहिल्या अनौपचारिक कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाला पहिल्या डावात आघाडी मिळाली.
दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव दुसऱ्या दिवशी ९ बाद २९९ धावसंख्येवरून पुढे सुरू झाल्यावर ३०९ धावांत रोखण्यात भारताला यश आले. मात्र, त्यानंतर फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताचा डाव २३४ धावांत संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेकडून ऑफ-स्पिनर प्रेनेलन सुब्रायन याने ६१ धावांत ५ गडी बाद केले. भारताकडून केवळ मुंबईकर आयुष म्हात्रे (६५) यालाच चांगली फलंदाजी करता आली. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिका संघाने दिवसअखेरीस बिनबाद ३० धावांची मजल मारताना आघाडी १०५ धावांपर्यंत वाढवली.
कर्णधार ऋषभ पंतचे पुनरागमन हे या सामन्याचे खरे आकर्षण होते. मात्र, यष्टींमागे यशस्वी ठरलेला पंत फलंदाजीत फारशी चमक दाखवू शकला नाही. आपल्या २९ मिनिटांच्या खेळीत दोन चौकारांसह त्याला केवळ १७ धावाच करता आल्या.
तिसऱ्या क्रमांकावरील साई सुदर्शनने सावध पवित्रा राखला. त्याने ९४ चेंडूत ३८ धावांची खेळी केली. देवदत्त पडिक्कल (६) आणि रजत पाटीदार (१९) बेजबाबदार फटके मारून बाद झाले. एका बाजूने उभा राहिलेल्या आयुष म्हात्रेची अर्धशतकी खेळी हीच भारतासाठी दिलासा देणारी बाब ठरली. पुढे आयुष बदोनीच्या ४७ चेंडूंतील वेगवान ३८ धावांच्या खेळीने भारताला पिछाडीचे अंतर कमी करता आले.
संक्षिप्त धावफलक
दक्षिण आफ्रिका ‘अ’ (पहिला डाव) : ९१.२ षटकांत सर्वबाद ३०९ (जॉर्डन हर्मन ७१, झुबेर हमझा ६६, रुबिन हर्मन ५४; तनुष कोटियन ४/८३, गुरनूर ब्रार २/४५, मानव सुथार २/६२)
भारत ‘अ’ (पहिला डाव) : ५८ षटकांत २३४ (आयुष म्हात्रे ६५, आयुष बदोनी ३८, साई सुदर्शन ३२; प्रेनेलन सुब्रायन ५/६१, लुथो सिपाम्ला २/३५) दक्षिण आफ्रिका ‘अ’ (दुसरा डाव) : १२ षटकांत बिनबाद ३० (जॉर्डन हर्मन नाबाद १२, लेसेगो सेनोक्वाने नाबाद ९)
