South Africa won by an innings and 32 runs : सेंच्युरियनमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि ३२ धावांनी गमावला. गुरुवारी (२८ डिसेंबर) सामन्याच्या तिसर्‍या दिवशी टीम इंडिया दुसऱ्या डावात १३१ धावांवर सर्वबाद झाली. तत्पूर्वी, भारताने पहिल्या डावात २४५ धावा केल्या होत्या. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४०८ धावा केल्या. आफ्रिकन संघाकडे पहिल्या डावात १६३ धावांची आघाडी होती. दक्षिण आफ्रिकेच्या या विजयात डीन एल्गर, मार्को जॅन्सेन आणि कागिसो रबाडाने मोलाचे योगदान दिले. हा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.

विराट कोहलीच्या रूपाने भारताला १०वा धक्का बसला. मार्को जॅन्सेनच्या चेंडूवर त्याने अप्रतिम फटका मारला, पण धावत जाऊन कागिसो रबाडाने उत्कृष्ट झेल घेतला. विराट ८२ चेंडूत ७६ धावा करून कोहली बाद झाला. त्याने आपल्या खेळीत १२ चौकार आणि एक षटकार मारला. दरम्यान दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच मालिका जिंकण्याचे भारतीय संघाचे स्वप्नही भंगले. आता दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे. हा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी करण्याकडे भारतीय संघाचे लक्ष असेल.

भारताचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले –

दुसऱ्या डावात भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ७६ धावा केल्या. तसेच शुबमन गिलने २६ धावा केल्या. या दोघांशिवाय टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. श्रेयस अय्यर सहा, यशस्वी जैस्वाल पाच, केएल राहुल चार, मोहम्मद सिराज चार आणि शार्दुल ठाकूर दोन धावा करून बाद झाला. रोहित शर्मा आणि रविचंद्रन अश्विन यांना खातेही उघडता आले नाही. प्रसिध कृष्णा खाते न उघडता नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून नांद्रे बर्गरने चार, मार्को जॅनसेनने तीन आणि कागिसो रबाडाने दोन गडी बाद केले.

हेही वाचा – IND vs SA 1st Test : रविचंद्रन अश्विनने मार्को जॅनसेनला दिला मांकडिगचा इशारा, सोशल मीडियावर फोटो होतोय व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डीन एल्गरचे द्विशतक हुकले –

त्तत्पूर्वी तिसऱ्या दिवशी डीन एल्गरने शानदार फलंदाजी केली आणि तो द्विशतकाच्या जवळ असताना १८५ धावांवर तो शार्दुल ठाकूरच्या शॉर्ट बॉलवर केएल राहुलच्या हाती झेलबाद झाला. यानंतर अश्विनने १९ धावांच्या स्कोअरवर कोईत्झेला बाद केले. शेवटी बुमराहने रबाडाला एका धावेवर आणि नांद्रे बर्जरला शून्यावर बाद केले. आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा दुखापतीमुळे फलंदाजीला आला नाही आणि आफ्रिकेचा डाव ४०८ धावांवर आटोपला.