दुलीप करंडक क्रिकेट स्पध्रेच्या अंतिम फेरीत दक्षिण विभागाने मध्य विभागाकडून हार पत्करली होती. त्या पराभवाचे उट्टे फेडण्याची संधी दक्षिण विभागाला शनिवारी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या देवधर करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मिळेल.
दिल्लीच्या फिरोझशाह कोटला स्टेडियमवर झालेल्या दुलीप करंडकाच्या सामन्यात पहिल्या डावात आघाडी घेऊनसुद्धा दक्षिण विभागाचा फक्त ९ धावांनी पराभव झाला होता. दक्षिण विभागाचे नेतृत्व आर. विनय कुमार सांभाळत आहे.  तर मध्य विभागाचे कर्णधारपद विजयी कर्णधार पीयूष चावला सांभाळत आहे.
अहमदाबादला नुकतेच विजय हजारे चषकावर नाव कोरणाऱ्या कर्नाटक संघातील सात खेळाडू दक्षिणेच्या संघात आहेत. मजबूत फलंदाजी आणि अचूक गोलंदाजी हे या संघाचे वैशिष्टय़ आहे. या दोन संघांतील विजेता संघ १ डिसेंबरला होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य लढतीत पश्चिम विभागाशी लढणार आहे.
आगामी विश्वचषक क्रिकेट स्पध्रेसाठी भारताचा ३० खेळाडूंचा संभाव्य संघ निश्चित करण्यासाठी देवधर करंडक एकदिवसीय स्पर्धा २०१४ मध्ये दुसऱ्यांदा होत आहे.
प्रतिस्पर्धी संघ :
दक्षिण विभाग : आर. विनय कुमार (कर्णधार), मयांक अगरवाल, अमित यादव, बाबा अपराजित, आशीष रेड्डी, स्टुअर्ट बिन्नी, अमोघ सुनील देसाई, दर्शन मिसाल, अभिमन्यू मिथुन, करुण नायर, मनीष पांडे, सचिन बेबी, संजू सॅमसन, चिरुपल्ली स्टीफन, रॉबिन उथप्पा (यष्टीरक्षक).
मध्य विभाग : पीयूष चावला (कर्णधार), अक्षदीप नाथ, अनुरीत सिंग, अंकुश बेन्स, स्वप्निल बंदिवार, मुकुल डगर, अर्जित गुप्ता, अभिषेक कौशिक, कुलदीप यादव, अशोक मनेरिया, ईश्वर पांडे, पंकज सिंग, मनीष रावत (यष्टीरक्षक), जलाज सक्सेना जितेश शर्मा (यष्टीरक्षक).