माद्रिद : बार्सिलोना संघाने स्पॅनिश ला लिगा फुटबॉलमधील आपली विजयी मालिका सहाव्या सामन्यातही कायम राखली. बार्सिलोनाने यजमान व्हिलारेयालवर ५-१ अशी मात केली. मात्र, या सामन्यात बार्सिलोनाचा गोलरक्षक टर स्टेगनच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्याला काही महिने मैदानाबाहेर राहावे लागणार आहे.

मध्यंतरापूर्वी काही क्षण आधी गोलजाळीत येणाऱ्या चेंडूला हवेत उडी मारून अडवताना खाली येताना स्टेगन विचित्र पद्धतीने गुडघ्यावर आपटला. या दुखापतीत त्याचा उजवा गुडघा निखळल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार स्टेगनला स्टेडियममधून रुग्णवाहिकेतून नेण्यात आले. त्यानंतर तो व्हीलचेअरवरून रुग्णालयातून बाहेर पडताना दिसला. ‘‘स्टेगनची दुखापत गंभीर दिसून येत असून, आमच्यासाठी हा मोठा धक्का आहे,’’ असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक हॅन्सी फ्लिक यांनी सांगितले.

हेही वाचा >>>IND vs BAN: दुसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियात होऊ शकतात दोन मोठे बदल, कानपूरच्या खेळाडूचे होणार पुनरागमन, वाचा संभाव्य प्लेईंग इलेव्हन

व्हिलारेयालविरुद्ध बार्सिलोनासाठी पूर्वार्धात रॉबर्ट लेवांडोवस्कीने दोन, तर उत्तरार्धात राफिनियाने दोन आणि पाब्लो टोरेने एक गोल केला. लेवांडोवस्कीचे सहा सामन्यांत सहा गोल झाले असून, सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो आघाडीवर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.