आयपीएल २०२१ मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करणाऱ्या संजू सॅमसनला संघाला प्लेऑफमध्ये नेण्यात अपयश आलं असलं तरी आता त्याला मोठी लॉटरी लागण्याची शक्यता आहे. नाही आम्ही पैशांच्या लॉटरीबद्दल नाही बोलत आहोत. ही लॉटरी म्हणजे संजू सॅमसनला टी २० विश्वचषकाआधी भारतीय संघांमध्ये स्थान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. अशी शक्यता व्यक्त करण्यामागील कारण म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने जारी केलेला एक आदेश. बीसीसीआयने संजू सॅमसनला पुढील सुचना मिळेपर्यंत युएईमध्ये थांबण्याचे निर्देश दिले आहे. आयपीएल संपल्यानंतर दोन दिवसांनी म्हणजेच १७ ऑक्टोबरपासून टी २० विश्वचषकाचे सामने सुरु होत आहे. भारताचा पहिला सामना २४ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरोधात होणार आहे.

संजूला संधी मिळण्याची शक्यता…
संजू सॅमसनला संघाला प्लेऑफमध्ये नेता आलं नसलं तरी त्याच्या फलंदाजीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे. सध्या निवडण्यात आलेल्या १५ जणांच्या संघामधील काही खेळाडूंना दुखापत झाली आहे तर काहींची कामगिरी म्हणावी तशी नाहीय. त्यामुळेच आता संघाबद्दल बीसीसीआयकडून फेरविचार केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. त्यामुळेच आयपीएलनिमित्त युएईमध्ये असलेल्या संजू सॅमसनला राजस्थानचा संघ स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतरही मायदेश परत न येता युएईमध्ये थांबण्याचे निर्देश बीसीसीआयने दिलेत.

संजूची कामगिरी कशी राहिली आहे?
संजू सॅमसनने २०२१ च्या आयपीएलच्या पर्वात १४ सामन्यांत ४० च्या सरासरीने ४८४ धावा केल्या आहेत. त्याने यंदाच्या पर्वात एक शतक आणि दोन अर्धशतकं ठोकली आहेत. सॅमसनने युएईच्या मैदानांवर ८२ आणि नाबाद ७० धावांची खेळीही केलीय. आयपीएलच्या युएईमधील पर्वात हार्दिक पांड्या आणि राहुल चाहरसारख्या खेळाडूंची कामगिरी चांगील राहिलेला नाही. आयएएनएसच्या वृत्तानुसार संजू सॅमसनला पुढील सूचना मिळेपर्यंत युएईमध्येच थांबण्यास संगितलं. आहे. राजस्थानचा संघ ७ ऑक्टोबर रोजीच स्पर्धेतून बाहेर पडलाय.

यांनाही संधी मिळण्याची शक्यता…
टी २० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या १५ जणांच्या संघामध्ये बदल करण्यासाठी बीसीसीआयकडे १५ ऑक्टोबरपर्यंतचा वेळ आहे. आज म्हणजेच १३ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाची नवीन जर्सी लाँच करण्यात येणार आहे. प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार आज भारतीय संघामधील फेरबदल करण्यासंदर्भातील महत्वाची घोषमा केली जाऊ शकते. उमरान मलिक, आवेश खान आणि व्यंकटेश अय्यरसारखे खेळाडू संघासोबत राहतील यासंदर्भातील बातम्या आधीच समोर आल्या आहेत. चौथा खेळाडू म्हणून आरसीबीचा जलद गोलंदाज हर्षल पटेललाही संघामध्ये किमान नेट प्रॅक्टीससाठी तरी संधी मिळू शकते असं सांगितलं जातं आहे.

सध्या निवडण्यात आलेला भारतीय संघ

’  फलंदाज : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव

’  यष्टीरक्षक : ऋषभ पंत, ईशान किशन

’  अष्टपैलू : हार्दिक पंडय़ा

’  वेगवान गोलंदाज : जसप्रीत बुमरा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

’  फिरकीपटू : रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर

’  राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चहर