गेली तीन दशके आपल्या लेखणीसह समालोचनाने मराठी क्रीडा पत्रकारितेत आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवणारे आणि क्रिकेटसह देशी खेळांच्या प्रचार आणि प्रसारासाठी सदैव झटणारे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार व समीक्षक चंद्रशेखर प्रभाकर संत यांचे गुरुवारी सकाळी त्यांच्या मुलुंड येथील राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुजाता आणि दोन मुले (चैतन्य आणि प्रसन्न) असा त्यांचा परिवार आहे.
छातीत दुखू लागल्यामुळे संत यांना बुधवारपासून थोडे अस्वस्थ वाटत होते. उपचारासाठी रुग्णालयात जाऊन घरी परतल्यानंतर सकाळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका बसला, काही क्षणांतच त्यांची प्राणज्योत माळवली, असे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर विक्रोळी टागोरनगर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी अनेक खेळातील खेळाडू, पत्रकारांसह मुंबई क्रिकेट असोसिएशन, प्रेस क्लब तसेच स्पोर्ट्स जर्नालिस्ट फेडरेशन ऑफ मुंबईच्या वतीने त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
सुरुवातीला अभ्युदय बँकेत नोकरी केल्यानंतर त्यांनी पत्रकारितेची वाट धरली. १९७८च्या सुमारास ते महाराष्ट्र टाइम्स दैनिकात रुजू झाले. जवळपास तीन दशके क्रीडा पत्रकार म्हणून कार्यरत असणाऱ्या संत यांनी ‘स्पोर्ट्स वीक’ या साप्ताहिकात काम केले होते. देशी खेळांबरोबर क्रिकेटचे समालोचन करताना त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या माध्यमातून घराघरात स्थान मिळवले होते.
निवृत्तीनंतरही खेळांच्या प्रसारासाठी ते झटत होते. भारतीय क्रीडा पत्रकार महासंघात ते प्रदीर्घ कालापासून खजिनदारपदी कार्यरत होते.
कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९८३मध्ये इंग्लंडमध्ये जाऊन विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला होता. चंद्रशेखर संत यांनी त्या स्पर्धेचे वृत्तांकन केले होते. भारताला दोन वेळा विश्वविजेता होताना पाहणाऱ्या भाग्यवान पत्रकारांपैकी संत हे एक होते. स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर त्यांनी विपुल लेखन केले. देशी खेळांनाही त्यांनी योग्य न्याय दिला. मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या संत यांनी वरिष्ठांसह नव्या दमाच्या पत्रकारांना नेहमीच मार्गदर्शन केले. त्यांच्या आकस्मित जाण्याने क्रीडा पत्रकारितेतील ‘संत’ हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.