अन्वय सावंत
चेन्नई : कोणतीही क्रीडा स्पर्धा यशस्वी ठरण्यासाठी त्यात आपली प्रतिभा आणि कौशल्य पणाला लावणाऱ्या खेळाडूंइतकीच, त्यांना पाठिंबा देणारे प्रेक्षक आणि जागतिक तसेच स्थानिक आयोजक यांची भूमिका महत्त्वाची असते.
गेल्या गुरुवारपासून भारतात सुरू झालेल्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विविध देशांचे खेळाडू आणि संघ यांनी आपली भूमिका चोख बजावली आहे. न्यूझीलंडच्या डेव्हॉन कॉन्वे आणि रचिन रवींद्र यांची शतके, तुलनेने बलाढय़ पाकिस्तानविरुद्ध नेदरलँड्सच्या बास डी लीडेचा झुंजार अष्टपैलू खेळ आणि दक्षिण आफ्रिकेची विश्वचषक विक्रमी धावसंख्या, ही याची काही उत्तम उदाहरणे. मात्र त्यांच्या खेळाचे कौतुक करायला स्टेडियममध्ये फारसे प्रेक्षकच नव्हते ही खेदजनक बाब.
अहमदाबाद येथील १ लाख ३२ हजार आसनक्षमता असलेल्या स्टेडियममध्ये इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सलामीची लढत रंगली. हा सामना ‘हाऊसफुल्ल’ असल्याचे तिकीट विक्रीची जबाबदारी असलेल्या संकेतस्थळाकडून सांगण्यात आले. मात्र प्रत्यक्षात सामन्याला ३० हजारांचीही उपस्थिती नव्हती. पुढे पाकिस्तान-नेदरलँड्स (हैदराबाद), अफगाणिस्तान-बांगलादेश (धरमशाला) आणि दक्षिण आफ्रिका-श्रीलंका (दिल्ली) या सामन्यांतही प्रेक्षक उपस्थितीचे असेच काहीसे चित्र होते. मात्र रविवारी भारतीय संघ मैदानावर उतरताच हे चित्र बदलले.
हेही वाचा >>>IND vs AUS, World Cup: टीम इंडिया विश्वचषकात अडचणीत! शुबमन गिल पुढील सामन्यातूनही बाहेर होण्याची शक्यता, जाणून घ्या
भारतीय संघाने रविवारी चेन्नईतील ऐतिहासिक एमए चिदम्बरम अर्थात चेपॉक स्टेडियमवर यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळला. सामन्याला सुरुवात होण्याची वेळ ही दुपारी दोनची होती. परंतु चेन्नईकर आणि भारताच्या अन्य राज्यांतून, तसेच अन्य देशांतून आलेल्या क्रिकेट चाहत्यांनी सकाळी ११.३० वाजल्यापासूनच चेपॉकच्या प्रवेशद्वाराबाहेर रांगा लावण्यास सुरुवात केली. त्याच वेळी काही चाहते असेही होते की ज्यांची सामना पाहण्याची इच्छा तर होती, पण त्यांना तिकीट मिळू शकले नव्हते. मात्र आपल्या लाडक्या खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी ते उत्सुक होते. त्यामुळे या चाहत्यांची ‘कुणी तिकीट देता का तिकीट..?’ अशीच काहीशी स्थिती होती.
चेन्नईचाच रहिवासी असलेला एक चाहता हातात सामन्याचे तिकीट घेऊन स्टेडियमच्या एका प्रवेशद्वाराशेजारी आपल्या मित्राची वाट पाहत उभा होता. त्याच्या हातातील तिकीट पाहून ‘तू ते आम्हाला देतोस का?’ अशी काहींनी त्याला विचारणा केली. सततच्या या विचारणेला कंटाळून अखेर तो पुढे निघून गेला. हे झाले केवळ एक उदाहरण. अशीच काही अन्य उदाहरणेही पाहायला मिळाली. विश्वचषकाबाबतचा उत्साह वाढण्याच्या दृष्टीने ही निश्चित सकारात्मक बाब आहे.
यंदा विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांइतकीच किंवा त्याहूनही अधिक तिकीट विक्री आणि स्टेडियममधील प्रेक्षकसंख्या याची चर्चा रंगली आहे. एकीकडे सर्व तिकिटांची विक्री झाल्याचे सांगण्यात येत असले, तरी पहिल्या चार सामन्यांत स्टेडियममध्ये मात्र तसे दिसले नाही. भारताच्या सामन्याला अपेक्षेप्रमाणे प्रेक्षक लाभले. आता विश्वचषकाच्या पुढील सामन्यांतही क्रिकेटवेडे भारतीय आपल्या संघासह अन्य संघांचेही सामने पाहण्यासाठी विविध स्टेडियममध्ये गर्दी करतील हीच आशा.
स्टेडियम निळेशार
‘आयपीएल’दरम्यान चेपॉक स्टेडियम हे ‘पिवळय़ा’ रंगाने भरलेले असते. रविवारी झालेल्या सामन्यातही एक संघ ‘पिवळय़ा’ रंगाची जर्सी परिधान करून खेळत होता. परंतु या वेळी चाहत्यांचा पूर्ण पाठिंबा हा ‘निळय़ा’ रंगाची जर्सी घालून खेळत असलेल्या भारतीय संघाला मिळाला. एरवी चेन्नई सुपर किंग्जच्या ‘पिवळय़ा’ रंगाने भरणारे चेपॉक स्टेडियम रविवारी मात्र ‘निळय़ा’ रंगात न्हाऊन निघाले होते.