खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे उद्घाटन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेश हे देशभरातील खेळाडूंचे ‘केंद्र’ बनले आहे. यावर्षी खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सचे आयोजन उत्तर प्रदेशमध्ये २५ मे ते ३ जून या कालावधीत होत आहे. या खेळांमध्ये ४७५० हून अधिक खेळाडू २१ खेळांमध्ये २०० हून अधिक विद्यापीठांचे प्रतिनिधित्व करत आहेत. वाराणसी, गोरखपूर, लखनऊ आणि गौतम बुद्ध नगर येथे खेळांचे आयोजन केले जात आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या खेळांचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आधीच्या सरकारांच्या खेळांबद्दलच्या दृष्टिकोनाचा जिवंत पुरावा म्हणजे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील घोटाळा. क्रीडास्पर्धेत एक घोटाळा केला गेला जो भारताची प्रतिष्ठा कमी करण्यासाठी कारणीभूत ठरला.” मोदी पुढे म्हणाले, “पूर्वी पंचायत युवा क्रीडा अभियान ही योजना आमच्या गावातील आणि ग्रामीण भागातील मुलांना खेळण्याची संधी मिळावी म्हणून राबवायची, पण नंतर तिचे नाव बदलून राजीव गांधी खेल अभियान असे करण्यात आले. या मोहिमेतही केवळ नाव बदलण्यावर भर देण्यात आला होता, देशातील क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्यात आलेला नाही.” या खेळांचा शुभंकर जीतू हा रेनडिअर आहे जो उत्तर प्रदेशचा राज्य प्राणी आहे. बनारस हिंदू विद्यापीठ (BHU), वाराणसी येथे ३ जून रोजी या खेळांचा समारोप होईल. वेळापत्रकानुसार, लखनऊमध्ये ८ ठिकाणी १२ खेळांचे (तिरंदाजी, ज्युडो, मल्लखांब, व्हॉलीबॉल, तलवारबाजी, बॅडमिंटन, टेबल टेनिस, रग्बी, अॅथलेटिक्स, हॉकी, फुटबॉल) आयोजन केले जाणार आहे. गौतम बुद्ध नगरमध्ये (नोएडा) ३ ठिकाणी पाच खेळांचे (बास्केटबॉल, कबड्डी, बॉक्सिंग, जलतरण आणि वेटलिफ्टिंग) आयोजन केले जाईल. IIT-BHU, वाराणसी हे दोन खेळ (कुस्ती आणि योग) आयोजित करतील, तर, गोरखपूर आणि दिल्ली अनुक्रमे रोइंग आणि नेमबाजीचे आयोजन करतील. या खेळांमध्ये प्रथमच सेलिंगचा समावेश करण्यात आला आहे. हेही वाचा: IPL2023: सचिनने मान झुकवून केले कौतुक तर क्रिकेटच्या देवाचे मन जिंकलेल्या आकाशनेही ‘या’ शैलीत लुटला पार्टीचा आनंद ५ मे रोजी लखनऊहून पाठवण्यात आलेली खेळांची मशाल राज्यातील ७५ जिल्ह्यांतून ८,९४८ किमीचा प्रवास करून बुधवारी लखनऊमध्ये पोहोचली. लखनऊहून चार टॉर्च पाठवण्यात आल्या होत्या, त्यासोबत या खेळांचा शुभंकर जीतू होता. यादरम्यान साडेपाच लाखांहून अधिक लोकांनी आपली उपस्थिती नोंदवली आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्समध्ये सहभागी होणाऱ्या विविध विद्यापीठांच्या सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन दिले. यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक आणि राज्यातील सर्व मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.