Andre Russell Retirement: गेल्या काही वर्षांत वेस्ट इंडिजच्या अनेक दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकेकाळी सलग २ टी – २० वर्ल्डकप जिंकणारा वेस्ट इंडिजचा संघ आता संघर्ष करत आहे. एकापेक्षा एक भेदक मारा करणारे गोलंदाज आणि आक्रमक फलंदाजी करणारे फलंदाज असलेल्या वेस्ट इंडिज संघातील प्रमुख खेळाडूंनी संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला. यात आणखी एक नाव जोडलं जाणार आहे. वेस्ट इंडिजचा स्टार अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीसीने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
एका महिन्यापूर्वीच वेस्ट इंडिजचा स्टार फलंदाज निकोलस पूरनने वयाच्या २९ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. या निर्णयामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. आता आंद्रे रसेल देखील या संघाची साथ सोडणार आहे. वेस्ट इंडिजच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघातील महत्वाचा भाग असलेल्या आंद्रे रसेलची ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. मात्र, तो या मालिकेतील केवळ २ सामने खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. हा वेस्ट इंडिज क्रिकेट संघासाठी मोठा धक्का आहे.
ऑस्ट्रेलियाचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. कसोटी मालिकेनंतर आता दोन्ही संघ टी -२० मालिकेत आमनेसामने येणार आहेत. ही मालिका आंद्रे रसेलच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटची मालिका ठरणार आहे. तो मालिकेतील सुरुवातीचे २ सामने खेळणार आहे. आंद्रे रसेलने वेस्ट इंडिजसाठी ८४ टी -२० सामने खेळले आहेत. तो आपल्या होम ग्राउंडवर शेवटचे २ सामने खेळणार आहे.
आंद्रे रसेलने वेस्ट इंडिजला २०१२ आणि २०१६ टी -२० वर्ल्डकप जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती. इथून पुढे तो केवळ लीग क्रिकेट स्पर्धा खेळताना दिसून येणार आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी -२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा संघ
शाई होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, जेडिया ब्लेड्स, रोस्टन चेस, मॅथ्यू फोर्डे, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, अकिल होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, एविन लुईस, गुडाकेश मोटी, रोवमन पॉवेल, आंद्रे रसेल, शेरफेन रुदरफोर्ड, रोमारियो शेफर्ड