पांचगणीतील राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेच्या निमित्ताने पहिल्याच दिवशी ‘दांडी’यात्रेचे चित्र समोर आले. सांगलीचे नितीन शिंदे यांची निरीक्षक आणि कोल्हापूरचे भगवान पवार यांची पंचप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. परंतु स्पध्रेच्या आदल्या दिवशी यापैकी कोणीही फिरकले नाही. स्पध्रेच्या दोन्ही गटांचा कार्यक्रम निश्चित झाल्यानंतर पहिल्या दिवशीचे सामने सुरू झाल्यावर सायंकाळी नितीन शिंदे यांचे आगमन झाले, तर भगवान पवार यांनी मात्र पहिल्या दिवशी दांडी मारली आहे. त्यामुळे सहाय्यक पंचप्रमुख तानाजी भिलारे यांनाच स्पध्रेचा कार्यक्रम तयार करणे, आदी कार्याची जबाबदारी पेलावी लागली. या स्पध्रेला नेमण्यात आलेल्या राज्यातील अनेक पंचांचीही गैरहजेरी जाणवत होती.
याविषयी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे सरकार्यवाह रमेश देवाडीकर म्हणाले की, ‘‘राज्य संघटनेकडून एखाद्या स्पध्रेसाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या प्रतिनिधींना काही अडचणींमुळे हजेरी लावता येत नसेल, तर त्यांनी याविषयी आम्हाला कल्पना द्यावी. आम्ही पर्यायी व्यवस्था करू. परंतु या घटनेबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत.’’ तथापि, शिंदे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, ‘‘राज्याकडून आम्हाला देण्यात आलेल्या पत्रात १८ जानेवारीला स्पध्रेला पोहोचावे, असे नमूद करण्यात आले आहे आणि त्यानुसार मी माझ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.’’
राणी लक्ष्मीबाई संघाचा ‘संघर्ष’मय विजय
पुण्याच्या राणी लक्ष्मीबाई संघाच्या खेळाडूंनी ‘संघर्ष’मय विजयानिशी पांचगणी व्यायाम मंडळाने आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या राज्यस्तरीय कबड्डी स्पध्रेत विजयी सलामी नोंदवली. याचप्रमाणे व्यावसायिक पुरुष विभागात रिझव्र्ह बँकेने हिंदुजा हॉस्पिटल संघावर २०-१९ अशी फक्त एका गुणाने मात केली. महिलांच्या उद्घाटनीय सामन्यात मुंबई उपनगरच्या संघर्ष संघाने पहिल्या सत्रात १४-११ अशी आघाडी घेतली होती. कोमल देवकरच्या चढाया आणि दीपा बुर्टेच्या पकडींनी संघर्षने आपले वर्चस्व राखले होते. परंतु दुसऱ्या सत्रात कोमलच्या दोनदा पकडी झाल्या आणि संघर्षवर लोण पडला. याचाच फायदा उचलत लक्ष्मीबाई संघाने २८-२० अशा फरकाने दमदार विजयाची नोंद केली. या विजयात लता चव्हाण आणि सुवर्णा येनपुरे यांनी सिंहाचा वाटा उचलला.