गतविजेत्या ऑस्ट्रेलियाचे इंग्लंडच्या समान गुण असतानाही टी-२० विश्वचषकातून ऑस्ट्रेलियाचा संघ बाहेर पडला आहे. यजमान देश ऑस्ट्रेलियाचे गट १ मध्ये ७ गुण आहेत, तर शनिवारी श्रीलंकेचा पराभव करणाऱ्या इंग्लंडचेही ७ गुण आहेत. पण निव्वळ धावगतीमुळे ऑस्ट्रेलियाला टी-20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठता आली नाही आणि ते स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.
दरम्यान टी-२० विश्वचषक २०२२ सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक स्पर्धेतून बाहेर पडणार हे निश्चित झाले होते. स्पर्धेच्या सुरुवातीलाच असे दोन आकडे समोर आले होते, ज्यावरून कांगारू संघ बाहेर होणार असल्याचे समजले होते.
१. यजमान देश कधीही टी-२० विश्वचषक जिंकू शकला नाही –
पहिला टी-२० विश्वचषक २००७ मध्ये खेळला गेला होता. दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करत विजेतेपद पटकावले. २००७ पासून ७ टी-२० विश्वचषक खेळले गेले आहेत. आठवा टी-२० विश्वचषक ऑस्ट्रेलियात सुरू आहे. पण आतापर्यंत कोणत्याही यजमान देशाने एकदाही टी-२० विश्वचषक जिंकलेला नाही.
टी-२० विश्वचषक २००७ दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला – विजेता भारत
टी-२० विश्वचषक २००९ इंग्लंडमध्ये खेळला गेला – विजेता पाकिस्तान
टी-२० विश्वचषक २०१० वेस्ट इंडिजमध्ये खेळला गेला – विजेता इंग्लंड
टी-२० विश्वचषक २०१२ श्रीलंकेत खेळला गेला – विजेता वेस्ट इंडिज
टी-२० विश्वचषक २०१४ बांगलादेशमध्ये खेळला गेला – विजेता श्रीलंका
टी-२० विश्वचषक २०१६ भारतात खेळला गेला – विजेता वेस्ट इंडिज
टी-२० विश्वचषक २०२१ ओमान आणि यूएईमध्ये खेळला गेला – विजेता ऑस्ट्रेलिया
टी-२० विश्वचषक २०२२ ऑस्ट्रेलियात खेळला जात असून यजमान ऑस्ट्रेलिया या स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
२. गतविजेता संघ कधीही विजेतेपदाचे रक्षण करु शकला नाही –
आणखी एक आकडा आहे, जो ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला नाही. म्हणजेच गतविजेत्याला कधीही टी-२० विश्वचषकाचे जेतेपद राखता आले नाही. ऑस्ट्रेलिया हा गतविजेता असला, तरी त्यांना जेतेपदाचा बचाव करता आला नाही. मागील विजेत्या संघांबाबतही असेच झाले.
इंग्लंडच्या विजयामुळे ऑस्ट्रेलिया टी-२० विश्वचषक २०२२ मधून बाहेर –
इंग्लंडने श्रीलंकेवर विजय मिळवल्याने ऑस्ट्रेलियाला बाहेर व्हावे लागले. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोघांचे प्रत्येकी ७ गुण आहेत परंतु इंग्लंडचा निव्वळ धावगती ऑस्ट्रेलियापेक्षा चांगला आहे, ज्यामुळे ते उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. इंग्लंडची निव्वळ धावगती +०.४७३ आहे, तर ऑस्ट्रेलिया निव्वळ धावगती -०.१७३ आहे.
इंग्लंड विरुद्ध श्रीलंका सामन्याबद्दल बोलायचे तर, शनिवारी झालेल्या महत्त्वपूर्ण टी-२० विश्वचषक सामन्यात श्रीलंकेने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना १४१/८ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १९.४ षटकांत ६ गडी गमावून लक्ष्य गाठले.