मला पुन्हा ऑस्ट्रेलियाकडून खेळण्याची तीव्र इच्छा आहे. पण बॉल टॅम्परिंग प्रकरणात सुनावलेल्या १२ महिन्याच्या बंदीच्या शिक्षेला मी आव्हान देणार नाही असे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथने स्पष्ट केले आहे. संपूर्ण क्रिकेट विश्वाला हादरवून सोडणाऱ्या बॉल टॅम्परिंग प्रकरणात क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागच्या आठवडयात स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यावर आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेट खेळण्यावर वर्षभराची बंदी घातली आहे.

प्रत्यक्ष बॉल टॅम्परिंग करणारा सलामीवीर कॅमरुन बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात या तिघांनी मिळून बॉल टॅम्परिंग केले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तिघांनी आपण चूक केल्याचे कबूल केले आहे. स्मिथ आणि वॉर्नरला जाहीर पत्रकार परिषदेत चूक कबूल करताना रडू कोसळले होते. त्यामुळे त्या तिघांबद्दल ऑस्ट्रेलियासह क्रिकेट जगतातून मोठया प्रमाणातून सहानुभूती व्यक्त होत आहे. गुरुवारपर्यंत या तिघांना शिक्षा मान्य करणार कि, शिक्षेला आव्हान देणार ते क्रिकेट ऑस्ट्रेलियाला कळवायचे आहे. शिक्षेला आव्हान देण्याचा या तिघांनाही अधिकार आहे.
वॉर्नर आणि बॅनक्रॉफ्टने अद्याप यावर निर्णय घेतलेला नाही. पण स्मिथने सोशल मीडियावरुन आपण पूर्ण वर्षभराची बंदीची शिक्षा भोगणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

स्मिथची ऑस्ट्रेलियामध्ये फलंदाजीच्या बाबतीत सर डॉन ब्रॅडमन यांच्याबरोबर तुलना केली जाते. कसोटी क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या स्मिथवर बॉल टॅम्परिंगच्या पूर्ण कटाची माहिती असल्याचा आरोप आहे. वॉर्नरने कट रचला आणि बॅनक्रॉफ्टने कटाची अंमलबजावणी केली. या प्रकरणामुळे स्मिथला आयपीएलमध्येही खेळता येणार नसून प्रायोजकांनीही त्याच्याकडे पाठ फिरवली आहे.