उत्तरार्धातील वेगवान खेळाच्या जोरावर भारताने पाकिस्तानला ४-० अशी धूळ चारली आणि २१-वर्षांखालील गटाच्या सुलतान जोहार बोहरूचषक हॉकी स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदविला.  
सामन्यात निर्विवाद वर्चस्व गाजविणाऱ्या भारताने केवळ ११ मिनिटांच्या कालावधीत तीन गोल केले. सुखमोंजित सिंग याने ३८व्या व ४६व्या मिनिटाला गोल केले, तर इम्रान खान (४५वे मिनिट) व रमणदीप सिंग (६१वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करीत त्याला चांगली साथ दिली.
भारताने या विजयासह साखळी गटात मलेशियाच्या साथीत आघाडीस्थान घेतले आहे. त्यांचे प्रत्येकी नऊ गुण झाले आहेत. अव्वल साखळी गटात भारताची गुरुवारी दक्षिण कोरियाशी गाठ पडणार आहे. साखळी गटात पहिले दोन क्रमांक मिळविणारे संघ अंतिम लढतीसाठी पात्र ठरणार आहेत.
सामन्यातील पूर्वार्धात पाकिस्तानच्या खेळाडूंनी काही चांगल्या चाली केल्या मात्र त्यांच्या या चाली भारतीय खेळाडूंनी असफल ठरविल्या. भारतीय खेळाडूंनीही पूर्वार्धात गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, मात्र त्यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. उत्तरार्धात भारतीय खेळाडूंना गोल करण्याची लय सापडली. तिसऱ्याच मिनिटाला भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचा फायदा घेत सुखमोंजित सिंग याने भारताचे खाते उघडले. हा गोल झाल्यानंतर भारताच्या चालींना अधिकच वेग आला. सामन्याच्या ४५व्या मिनिटाला इम्रानखान याने संघाचा दुसरा गोल नोंदविला. पुढच्याच मिनिटाला भारताला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. त्याचा पुरेपूर फायदा घेत सुखमोंजितसिंग याने स्वत:चा दुसरा व संघाचा तिसरा गोल केला. रमणदीप सिंग याने ६१व्या मिनिटाला कोठाजितसिंग याच्या पासवर गोल करीत भारताची बाजू बळकट केली.