ऋषिकेश बामणे

१४ मार्च, २०२१. युवा पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबईच्या शिलेदारांनी अंतिम फेरीत उत्तर प्रदेशचा अक्षरश: धुव्वा उडवत चौथ्यांदा विजय हजारे एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेचा करंडक उंचावला. यानंतर बरोबर नऊ महिन्यांनी म्हणजेच १४ डिसेंबर, २०२१ला पुदुच्चेरीविरुद्ध बलाढय़ मुंबईला मानहानीकारक पराभव पत्करावा लागला आणि त्यांचे २०२१-२२च्या हंगामातील आव्हानही संपुष्टात आले. त्यामुळे स्थानिक क्रिकेटमधील महासत्ता मानल्या जाणाऱ्या मुंबईची ही दुर्दशा कशामुळे झाली, हा प्रश्न शहरातील तमाम क्रीडाप्रेमींना भेडसावत आहे.

अमोल मुझुमदारच्या मार्गदर्शनाखाली उतरणाऱ्या मुंबईला ब-गटात तळाच्या स्थानी समाधान मानावे लागले. गतविजेत्या मुंबईने पाचपैकी फक्त एकच लढत जिंकली. पृथ्वी, श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर यांसारख्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत डावखुरा अष्टपैलू शाम्स मुलानीकडे मुंबईचे नेतृत्व सोपवण्यात आले. सूर्यकुमार यादव पहिल्या सामन्यानंतर संघात दाखल झाला. मात्र त्याचे पुनरागमनही संघाला तारू शकले नाही. मुंबईकडून या स्पर्धेत पाच खेळाडूंनी पदार्पण केले. यावरूनच संघाची घडी अंतिम साखळी लढतीपर्यंत नीट बसलीच नव्हती, हे स्पष्ट होते. यशस्वी जैस्वाल, सिद्धेश लाड, शिवम दुबे यांनाही लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. तमिळनाडू, कर्नाटक यांसारख्या बलाढय़ संघांसमोर मुंबईचा कस लागणार, हे अपेक्षित होते; परंतु बंगाल, पुदुच्चेरीविरुद्ध मुंबईच्या खेळाडूंनी दडपणात केलेला खेळ निराशाजनक होता. मुंबईच्या खेळाडूंमध्ये जिंकण्याच्या वृत्तीचा अभाव आढळला. त्यामुळे त्यांची देहबोलीसुद्धा खालावलेलीच होती.

हजारे करंडकाला प्रारंभ होण्याच्या दोन आठवडय़ांपूर्वी मुंबईत झालेल्या माधव मंत्री स्मृती स्पर्धेत आदित्य तरेच्या धडाकेबाज ९९ धावांच्या खेळीमुळे पारसी जिमखान्याने विजेतेपद मिळवले. या लढतीत मुलानीने चार बळी मिळवले. त्याची थेट मुंबईच्या कर्णधारपदी वर्णी लागली, तर तरेची मात्र एक प्रकारे संघातून हकालपट्टीच करण्यात आली. हाच ३४ वर्षीय तरे २०१८-१९ आणि २०२०-२१च्या विजय हजारे करंडकातील अंतिम फेरीत मुंबईचा संकटमोचक ठरला होता. मुंबईने या दोन्ही वेळेस अजिंक्यपदावर कब्जा केला. रोहित शर्मा, पृथ्वी, श्रेयस अय्यर यांच्याप्रमाणे मुंबईतून विकसित होणारा राष्ट्रीय संघासाठीचा आत्मविश्वास मुलानीकडे नव्हता अथवा संघाचे मनोबल उंचावणारी त्याची कामगिरीही नव्हती.

नोव्हेंबरमध्ये झालेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-२० स्पर्धेतही मुंबईची हीच गत झाली. एकीकडे अजिंक्य रहाणे भारताच्या कसोटी संघातील स्थानासाठी संघर्ष करत असताना त्याच्याकडे मुंबईच्या ट्वेन्टी-२० संघाचे कर्णधारपद सोपवणे मुंबईला महागात पडले. या स्पर्धेत त्याने फलंदाज म्हणून नक्कीच समाधानाकारक खेळ केला; परंतु मोक्याच्या क्षणी व्यूहरचना बदलण्यात आणि अन्य खेळाडूंना प्रेरित करण्यात तो कमी पडला. त्यामुळे पाचपैकी तीन लढती जिंकूनही मुंबईला साखळीतच गाशा गुंडाळावा लागला. पृथ्वी, तरे मुश्ताक अली स्पर्धेत अपयशी ठरले. कदाचित यामुळेच हजारे स्पर्धेतून तरेला वगळण्यात आले असावे. अननुभवी गोलंदाजीचा फटका येथेही मुंबईला बसला.

मुंबईच्या प्रगतीचा आलेख घसरण्यामागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे प्रशिक्षक. गेल्या वर्षभरात मुंबईला तीन विविध माजी क्रिकेटपटूंनी मार्गदर्शन केले. वर्षांच्या सुरुवातीला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत मुंबईला गटात तळाच्या स्थानी समाधान मानावे लागल्याने अमित पागनीस यांच्याकडून प्रशिक्षकपद काढून घेण्यात आले. त्यानंतर रमेश पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने विजय हजारे करंडक जिंकला; परंतु या यशामुळे त्यांची भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक झाली. त्यामुळे मुझुमदारकडे २०२१-२२ हंगामासाठी प्रशिक्षकपद सोपवण्यात आले. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंना सातत्याने विविध प्रशिक्षकांशी ताळमेळ साधणे कठीण गेले.

वाढती स्पर्धा आणि अन्य राज्यांतूनही उदयास येणारे प्रतिभावान खेळाडू यामुळे मुंबईला पूर्वीसारखा दर्जा राखणे कठीण जात आहे. आता १३ जानेवारीपासून रणजी स्पर्धेला प्रारंभ होणार असून येथे तरी मुंबई प्रतिष्ठेनुसार खेळ करणार का, हे पाहणे रंजक ठरेल. तूर्तास मात्र मुंबई संघाला योग्य दिशा दाखवणारा कर्णधार, प्रशिक्षक आणि निवड समितीतील पारदर्शक कारभार याचीच सर्वाधिक गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

rushikesh.bamne@expressindia.com