Sunil Gavaskar On Jemimah Rodrigues: नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही संघांमध्ये आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीतील सामना रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला, तर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. त्यामुळे दोन्ही संघांना पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी उंचावण्याची संधी असणार आहे. दरम्यान या सामन्याआधी भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी जेमिमा रॉड्रिग्जबरोबर गाणं गाण्याचं वचन दिलं आहे.

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची धुलाई करणारी जेमिमा डांस आणि सिंगिंगसाठीही प्रसिद्ध आहे. दरम्यान सुनील गावसकर यांनी वचन दिलं आहे की, भारतीय संघाने जर अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं तर, जेमिमाहसोबत गिटारवर गाणे गाण्यास मला आवडेल.

स्पोर्ट्स टुडेवर बोलताना सुनील गावसकर म्हणाले, “जर भारताने विश्वचषक जिंकला तर ती आणि मी, जर तिला मान्य असेल तर. आम्ही दोघं गाणं गाऊ. तिच्याकडे तिचा गिटार असेल आणि मी तिच्यासोबत गाणं गाणार. काही वर्षांपूर्वी बीसीसीआयच्या एका कार्यक्रमात आम्ही खरंच ते केलं होतं. तिथे एक बँड वाजत होता आणि आम्ही त्यात सामील होण्याचा निर्णय घेतला. ती गिटार वाजवत होती आणि मी गाणं गात होतो. मला ते पुन्हा करायला आवडेल.”

भारतीय संघाचं पहिल्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्नं लवकरच पूर्ण होऊ शकतं. भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. भारतीय संघ आता जेतेपदापासून एक पाऊल दूर आहे. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारतीय संघ इतिहास घडविण्याच्या प्रयत्नात असणार आहे. हा सामना नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये रंगणार आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाकडून लिचफील्डने दमदार शतकी खेळी केली. तर एलिस पेरीने अर्धशतक झळकावलं. ऑस्ट्रेलियाचा डाव ३३८ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून कर्णधार हरमनप्रीत कौरने ८९ धावांची खेळी केली. तर जेमिमा रॉड्रिग्जने नाबाद १२७ धावांची खेळी करून भारतीय संघाला विजय मिळवून दिला.