डेव्हिड वॉर्नरच्या फटकेबाजीला अन्य फलंदाजांची सुरेख साथ लाभल्यामुळे सनरायजर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीग क्रिकेटमध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्सवर पाच गडी व सहा चेंडू राखून मात केली.

१९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादच्या वॉर्नर-जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या गडय़ासाठी अवघ्या ५८ चेंडूंत ११० धावा रचल्या. वॉर्नरने ३७ चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह ६९ धावा केल्या. बेअरस्टो (४५) बाद झाल्यानंतर हैदराबादचा डाव घसरला. परंतु रशीद खानने षटकार लगावत हैदराबादचा पहिलावहिला विजय साकारला.

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करताना सॅमसनने साकारलेल्या तुफानी फलंदाजीच्या बळावर राजस्थानने २० षटकांत २ बाद १९८ धावांचा डोंगर उभारला. सलामीवीर जोस बटलर (५) लवकर माघारी परतल्यावर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सॅमसनने कर्णधार अजिंक्य रहाणेसह

दुसऱ्या गडय़ासाठी ७५ चेंडूंत ११९ धावांची भागीदारी रचली. शाहबाज नदीमने रहाणेला (७०) बाद करत ही जोडी फोडली. सॅमसनने २०व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावत यंदाच्या ‘आयपीएल’मधील पहिल्या तर कारकीर्दीतील दुसऱ्या शतकाला गवसणी घातली. त्याने ५५ चेंडूंत १० चौकार व चार षटकारांसह नाबाद १०२ धावा केल्या.