प्रशिक्षक उदय पवार यांच्याकडून आठवणींना उजाळा

ऋषिकेश बामणे
मुंबई : महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी होते. खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून त्यांनी बॅडमिंटनसाठी दिलेले योगदान अमूल्य आहे. त्यामुळे निधनानंतरही कोटय़वधी भारतीयांच्या मनात त्यांचे स्थान कायम राहील, अशा शब्दांत भारताचे माजी बॅडमिंटनपटू आणि प्रशिक्षक उदय पवार यांनी नंदू नाटेकर यांना आदरांजली वाहिली.

नाटेकर यांचे बुधवारी वयाच्या ८८व्या वर्षी पुणे येथे निधन झाले. नाटेकर यांनी १५ वर्षांच्या कारकीर्दीत १००हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जेतेपदे मिळवताना बॅडमिंटनमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. नाटेकर यांच्या निधनाबद्दल पवार यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.

‘‘नंदू नाटेकर हे महाराष्ट्राने घडवलेले आजवरचे सर्वोत्तम बॅडमिंटनपटू आहेत, यात शंका नाही. मी त्यांना कधीही खेळताना पाहिले नाही. मात्र बॅडमिंटन विश्वातील जाणकारांकडून त्यांच्याविषयी सातत्याने ऐकत आलो आहे. त्याशिवाय माझे वडील आणि नाटेकर यांची घनिष्ठ मैत्री असल्याने मला अनेकदा त्यांची भेट घेता आली,’’ असे पवार म्हणाले.

‘‘नाटेकर यांचा बॅकहँडचा खेळ अप्रतिम होता. मात्र त्यांच्या खेळाची एकही चित्रफीत आपल्याकडे उपलब्ध नाही, हे आपलेच दुर्दैव म्हणावे लागेल. सुरेश गोयल, प्रकाश पदुकोण यांसह त्यांचीही भारताच्या महान बॅडमिंटनपटूंमध्ये गणना केली जायची. त्यांच्या निधनामुळे भारतीय बॅडमिंटनने एकप्रकारे महानायक गमावला आहे,’’ असेही पवार यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, नाटेकर हे माझ्या नामकरण सोहळ्याला उपस्थित असण्याबरोबरच लोणावळा येथील घरी माझ्या आईच्या हातचे जेवण खाण्यासाठी सातत्याने यायचे, अशी आठवणही पवार यांनी सांगितली.

ल्ल नंदू नाटेकर यांना भारतीय क्रीडा इतिहासात विशेष स्थान आहे. ते एक उत्कृष्ट बॅडमिंटनपटू तसेच उत्तम प्रशिक्षकही होते. त्यांच्या यशामुळे देशभरातील क्रीडापटूंना प्रेरणा मिळायची. नाटेकर यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना!

नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान

ल्ल आमच्यासाठी नाटेकर हे बॅडमिंटनमधील महान खेळाडू होते. त्यांनी बॅडमिंटनशिवाय टेनिसमध्येही कमाल दाखवली. त्यांचे खेळण्याचे कौशल्य, लवचिकता आणि समन्वय वाखाणण्याजोगा होता. नाटेकर यांच्या निधनामुळे बॅडमिंटनमध्ये पोकळी निर्माण झाली आहे.

– पुलेला गोपिचंद, राष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक

ल्ल नंदू नाटेकर यांचा वारसा यापुढेही सुरू ठेवणे गरजेचे आहे. १९६१मध्ये त्यांना प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्याकडून अनेकांना आपले आवडीचे क्षेत्र निवडण्यासाठी प्रेरणा मिळाली. नाटेकर यांचे कुटुंबीय आणि मित्र-मंडळींना या स्थितीला सामोरे जाण्याचे बळ लाभावे.

– अनुराग ठाकूर, केंद्रीय क्रीडामंत्री

ल्ल भारतीय बॅडमिंटनचे महानायक नंदू नाटेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सहा वेळा राष्ट्रीय जेतेपद मिळवण्याबरोबरच देशासाठी पहिले आंतरराष्ट्रीय अजिंक्यपद मिळवण्याचा पराक्रम नाटेकर यांनी केला. त्यांच्या खेळाव्यतिरिक्त एक उत्तम माणूस म्हणून ते नेहमीच सर्वाच्या स्मरणात राहतील.

– हिमंता बिस्वा सरमा, भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष

ल्ल भारतीय खेळाडू आज आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळवित असलेले यश नंदू नाटेकर यांनी त्या काळात रचलेल्या भक्कम पायावर उभे आहे. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वाची मोठी हानी झाली आहे. औपचारिक प्रशिक्षणाशिवाय स्वकष्टावर त्यांनी यश मिळविले. अनेक उदयोन्मुख खेळाडूंसाठी ते मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत होते. अर्जुन पुरस्काराने त्यांचा झालेला गौरव भारतीय बॅडमिंटन क्षेत्राचा गौरव होता.

अजित पवार, उपमुख्यमंत्री

ल्ल नाटेकर यांच्या निधनाने भारतीय क्रीडा क्षेत्रातील तेजस्वी तारा निखळला आहे. खेळाची शैली, चपळता आणि कौशल्याद्वारे त्यांनी देशातील आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धाही सहज जिंकल्या. क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे अनेक उत्तम खेळाडू घडले. मोठा मित्र परिवार असलेल्या नाटके रांचा पुणेकरांना सदैव अभिमान वाटला आहे. बॅडमिंटनमध्ये त्यांचे नाव अढळ राहील.

– अ‍ॅड. अभय छाजेड, अध्यक्ष, महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स असोसिएशन