नवी दिल्ली : लैंगिक शोषणाविरुद्ध न्यायासाठी लढणाऱ्या कुस्तीगिरांच्या आंदोलनाला दहा दिवस झाल्यानंतर आता न्यायालयातील वाद-प्रतिवाद आणि पडद्यामागील हालचालींनी वेग घेतला आहे.

आंदोलक कुस्तीगिरांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठासमोर बुधवारी लैंगिक शोषणाच्या आरोपांसंदर्भात बंद लिफाफ्यातून प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची परवानगी मागितली. त्याच वेळी आंतरराष्ट्रीय कुस्तीवर नियंत्रण ठेवणाऱ्या जागतिक संयुक्त कुस्ती संघटना (यूडब्लूडब्लू) आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) यांनीही या प्रकरणात लक्ष घातल्याने पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. या दोन्ही शिखर संघटनांच्या पत्रव्यवहारानंतर बुधवारी भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) अध्यक्ष पीटी उषा यांनी जंतरमंतरवर आंदोलक कुस्तीगिरांची भेट घेऊन त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

लैंगिक शोषणाचे आरोप असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध शुक्रवारी गुन्हा दाखल केला जाईल असे महान्याय अभिकर्ता तुषार मेहतांनी सर्वोच्च न्यायलयात सांगितले होते. मात्र, त्यापूर्वीच बुधवारी कुस्तीगिरांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंह यांच्या खंडपीठासमोर बंद लिफाफ्यातून आरोपांसंदर्भात प्रतिज्ञापत्र सादर करण्याची परवानगी मागितली. महान्याय अभिकर्त्यांना प्रतिज्ञापत्राची प्रत देण्यास आमची काहीच हरकत नाही. मात्र, ते सार्वजनिक होऊ नये म्हणून आम्ही ते बंद लिफाफ्यातूनतून सादर करण्याची परवानगी मागत आहोत, असे वकिलांनी सांगितले.

यावर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने बंद लिफाफ्यातून प्रतिज्ञापत्र सादर करण्यास मान्यता दिली. मात्र, त्याची एक प्रत महान्याय अभिकर्त्यांना देण्याचीही सूचना केली. या प्रकरणावर गुरुवारी सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर महान्याय अभिकर्ता मेहता यांनी हे प्रतिज्ञापत्र प्रकरणाचा तपास लावणाऱ्या अधिकाऱ्यांना देऊ शकतो का, अशी विचारणा खंडपीठाला केली. यालाही खंडपीठाने मान्यता दिली.

जागतिक कुस्ती संघटनेकडून आयओएकडे विचारणा

कुस्तीपटूंचा संघर्ष कायम असल्याने जागतिक संयुक्त कुस्ती संघटनेने (यूडब्लूडब्लू) याची दखल घेतली असून, त्यांनी भारतीय कुस्ती महासंघासह ‘आयओए’कडे भारतातील कुस्ती संघटना नक्की कोण चालवत आहे याबाबत विचारणा केली. ‘यूडब्लूडब्लू’ने या संदर्भात ‘आयओसी’लाही पत्र लिहिले आहे. ‘यूडब्लूडब्लू’कडून विचारणा झाल्यावर भारतीय कुस्ती महासंघाने सरकार कामकाजात हस्तक्षेप करत असल्याची तक्रार केली आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर नियमाने जाहीर केलेली निवडणूक सरकारने रोखली असल्याचे महासंघाने ‘यूडब्लूडब्लू’च्या तक्रारीत म्हटले आहे. या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयश आल्यावर ठोस उपाययोजना करण्याचा अधिकार आम्ही राखून आहोत, असा इशाराही ‘यूडब्लूडब्लू’च्या अध्यक्षांनी दिला आहे.

पीटी उषा यांची कुस्तीगिरांना भेट

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) या संदर्भात ‘आयओए’ला पत्र लिहून कुस्ती महासंघाबाबत निर्णय घेताना किंवा कुठलेही पाऊल उचलताना ‘यूडब्लूडब्लू’शी संपर्क साधावा अशी सूचना केली आहे. ‘आयओसी’कडून विचारणा झाल्यावर तातडीने ‘आयओए’ अध्यक्ष पीटी उषा यांनी आंदोलक कुस्तीगिरांची भेट घेऊन त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. विशेष म्हणजे सुरुवातीला उषा यांनी कुस्तीगीर रस्त्यावर उतरल्याने त्यांच्यावर टीका केली होती. कुस्तीगिरांनी ‘आयओए’कडे न येता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करणे हे बेशिस्त वागणुकीचे लक्षण असल्याचे उषा म्हणाल्या होत्या. यानंतर उषा यांना सर्व स्तरातून टीकेला सामोरे जावे लागले होते.

पीटी उषा सरकार किंवा ‘आयओए’कडून कुठलाही प्रस्ताव घेऊन आल्या नव्हत्या. उषा यांच्या भेटीमुळे आम्हाला दिलासा मिळाला आहे. उषा यांनी आम्हाला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे, ते त्यांनी पाळायला हवे. जोपर्यंत सर्व काही ठीक होत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, तोवर आंदोलन सुरूच राहील. उषा यांच्या भेटीनंतर या वादावर तोडगा निघेल अशी आशा आहे. – बजरंग पुनिया, आंदोलक कुस्तीगीर

खेळाडूंच्या समस्या आणि तक्रारी समजून घेण्यासाठी प्रत्येक राष्ट्रीय संघटनेत खेळाडू समिती आवश्यक असल्याचे कुस्तीगिरांच्या आंदोलनाने अधोरेखित झाले. कुस्तीगिरांनी ‘आयओए’च्या खेळाडू समिती अधिकाऱ्यांची भेट घ्यायला हवी होती. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे यावर थेट भाष्य करणे योग्य नाही. आम्ही कुस्तीगिरांच्या पाठीशी आहोत. त्यांना न्यायासाठी असे रस्त्यावर उतरलेले पाहून दु:ख होते.  – शरथ कमल, टेबल टेनिसपटू व खेळाडू समिती सदस्य