म्युनिक : भारताची १९ वर्षीय नेमबाज सुरुची सिंह हिने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरीसह विश्वचषक नेमबाजी स्पर्धेत शुक्रवारी सलग तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. यंदाच्या विश्वचषक हंगामात सुरुचीने ब्युनोस आयर्स आणि लिमा येथील स्पर्धेतही सोनेरी यश संपादन केले होते. आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत वैयक्तिक प्रकारात सुरुचीचे हे चौथे सुवर्णपदक ठरले.
म्युनिकमध्ये सुरुचीने २४१.१ गुणांचा वेध घेतला. अंतिम फेरीत सुरुवातीला चीनची कांस्यपदक विजेती कियानक्सुन याओ (२२१.७) हिला मागे टाकल्यानंतर सुरुचीने लक्ष्यभेदात अचूकता राखून १०.५ गुणांसह आघाडी घेतली. विजेतेपदासाठी सुरुचीला ही अचूकता खूप महत्त्वाची ठरली. तिने फ्रान्सच्या कॅमिल जेड्रझेवस्कीला (२४१.७) मागे टाकले. या मोठ्या आघाडीमुळे अखेरच्या संधीला ९.५ गुणांचा वेध घेऊनही सुरुचीच्या विजेतेपदाला धक्का बसला नाही. कॅमिलने अखेरच्या संधीला ९.८ गुणांचा वेध घेतला.
मनूचे अपयश
सुरुचीने ‘सुवर्ण’ कामगिरी करताना सलग तिसऱ्यांदा ऑलिम्पिकमधील दोन पदकविजेत्या मनू भाकरवर वर्चस्व राखले. पात्रता फेरीत सुरुची ५८८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. मनू ५७४ गुणांसह २५ व्या स्थानावर राहिली. विशेष म्हणजे अंतिम फेरीदरम्यान मनूने समालोचकाची भूमिका बजावताना सुरुचीचे कौतुक केले.