टी २० वर्ल्डकप स्पर्धेत न्यूझीलंड विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल पाहायला मिळाले. सुर्यकुमार यादव ऐवजी संघात इशान किशनला संधी देण्यात आली. मात्र न्यूझीलंडविरुद्ध खेळताना इशान किशन साजेशी कामगिरी करू शकला नाही. इशान किशन ८ चेंडूत ४ धावा करून बाद झाला. ट्रेन्ट बोल्टच्या गोलंदाजीवर डेरिल मिशेलने त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. त्यामुळे सुर्यकुमार यादव संघात का नाही? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सुर्यकुमार यादवच्या पाठीत दुखापत होत असल्याने बीसीसीआयच्या मेडिकल टीमने त्याला आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे संघात इशान किशनला संधी मिळाली. दुसरीकडे भुवनेश्वर कुमारच्या जागेवर शार्दुल ठाकुरला संघात स्थान मिळालं. नियमित सलामीवीरांपेक्षा वेगळा प्रयत्न म्हणून टीम इंडियाने इशान किशन आणि केएल राहुल ही जोडी आजमावून पाहिली. पण न्यूझीलंडने त्यांचा प्रयोग अयशस्वी ठरवला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने इशानला (४) तर पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात टीम साउदीने राहुलला झेलबाद केले. राहुलने ३ चौकारांसह १८ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये भारताला २ बाद ३५ धावा करता आल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेला रोहित शर्मा आणि कप्तान विराट कोहलीकडून आधाराची अपेक्षा होती, पण फिरकीरपटू ईश सोधीने दोघांना जाळ्यात अडकले. त्यानंतर ऋषभ पंतही (१२) माघारी परतला. संथ खेळणारा हार्दिकही १९व्या षटकात माघारी परतला. शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने ११ धावा कुटल्यामुळे भारताा शंभरीपार पोहोचता आले. डावाच्या शेवटच्या षटकात भारताने शतक पूर्ण केले. या षटकात भारताने ११ धावा काढल्या. २० षटकात भारताने ७ बाद ११० धावा केल्या. रवींद्र जडेजाने २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून बोल्टने २० धावांत ३ तर सोधीने १७ धावांत २ बळी घेतले.

न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू ईश सोधी यांनी केलेल्या माऱ्यासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. न्यूझीलंडने भारताला २० षटकात ७ बाद ११० धावांवर रोखले.