Asia Cup 2025 India Squad Announcement: आशिया चषक २०२५ आशिया चषक येत्या ९ सप्टेंबरपासून खेळवला जाणार आहे. दरम्यान भारतीय संघ कसा असू शकतो यावर चर्चा सुरू आहे, त्याचबरोबर सूर्यकुमार यादवची काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया झाल्याने तो स्पर्धेपर्यंत फिट होईल का, अशी चर्चा सुरू आहे. पण यादरम्यान टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आली आहे.

टीम इंडियाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवच्या फिटनेस रिपोर्टवर सर्वांचे लक्ष आहे. जूनमध्ये जर्मनीतील म्युनिक येथे सूर्यकुमार यादव याच्यावर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती, त्यानंतर तो एनसीएमध्ये फिटनेस मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.

सूर्यकुमार यादवच्या फिटनेस टेस्टवर मोठी अपडेट

इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी सूर्यकुमार यादव भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या बेंगळुरू येथील सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये होता, जिथे वैद्यकीय पथकाने त्याची फिटनेस टेस्ट केली. अहवालानुसार, या टेस्टचा निकाल आला आहे आणि भारतीय कर्णधाराला फिट घोषित करण्यात आलं आहे.

सूर्यकुमार फिट झाल्यामुळे टीम इंडियाला आणि विशेषतः निवड समितीला मोठा दिलासा मिळाला आहे, कारण या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा १९ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे नवीन कर्णधार निवडण्याचे आव्हान समोर असणार नाही आणि त्याचबरोबर संघाची फलंदाजीही मजबूत होईल. या अहवालात, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे की, फिटनेस परत मिळवत असलेला सूर्या संघाचे नेतृत्व करेल आणि तो निवड समितीच्या बैठकीलाही उपस्थित राहील.

आयपीएल आणि मुंबई टी२० लीगमध्ये खेळल्यानंतर यादव स्पोर्ट्स हर्नियाच्या तज्ञाचा सल्ला घेण्यासाठी परदेशात गेला होता. गेल्या वर्षीही त्याच्यावर स्पोर्ट्स हर्नियाची शस्त्रक्रिया झाली होती. २०२३ मध्ये त्याच्या घोट्याचीही शस्त्रक्रिया झाली होती.

आशिया चषक २०२५ कधी जाहीर होणार भारतीय संघ?

सूर्याने आयपीएल २०२५च्या हंगामात उत्कृष्ट फलंदाजी करत धावांचा पाऊस पाडला. सूर्याने या हंगामात एकूण ७१७ धावा केल्या, ज्याच्या आधारे मुंबई इंडियन्स संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी सूर्यकुमार यादव पूर्णपणे फिट होणं ही टीम इंडियासाठी आनंदाची बातमी आहे, कारण आशिया कपपासून वर्ल्डकप लक्षात घेता भारतीय संघाचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे.

अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील वरिष्ठ निवड समितीची बैठक मंगळवार, १९ ऑगस्ट रोजी होईल आणि ९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या आशिया कपसाठी संघ निवडदेखील होईल. या संघामध्ये शुबमन गिलला संधी देणार का, त्याचबरोबर भारताची टी-२० क्रिकेटमधील सलामी जोडी कोण असेल, यावरही सर्वांच्या नजरा असतील.