भारताचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने आशिया चषकाचे जेतेपद पटकावलं. सूर्यकुमार यादवचं लक्ष्य आता जगातील नंबर वन भारतीय संघाला सलग दुसरं टी-२० विश्वचषक पटकावून देणं हे असणार आहे. टी-२० विश्वचषक २०२६ फेब्रुवारीमध्ये खेळवला जाणार आहे, पण या विश्वचषकापूर्वीच सूर्यकुमार यादवने स्वत: आंतरराष्ट्रीय निवृत्तीचे संकेत दिले आहेत.
सूर्यकुमार यादव आता ३४ वर्षांचा आहे, त्याने येत्या ३ वर्षांमध्ये कोणत्या स्पर्धा खेळायच्या आहेत; हेदेखील निश्चित केल्या असून त्याच्या निवृत्तीबाबत त्याने मोठं वक्तव्य केलं आहे. सूर्यकुमार यादव भारतासाठी टी-20 मधील एक महत्त्वाचा फलंदाज आहे. फलंदाजीबरोबर सूर्याने भारताच्या टी-२० संघाच्या नेतृत्त्वाची जबाबदारीही उत्तमरितीने पार पाडली.
न्यूज २४शी संवाद साधताना सूर्यकुमार यादवने सांगितलं की, तो पुढील तीन ते चार वर्षे टी-२० क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यावर भर देत आहे. त्याने पुढे हेही उघड केलं की त्याचं लक्ष्य २०२८ मधील लॉस एंजेलिस ऑलिम्पिक आणि त्याच वर्षी होणारा टी-२० विश्वचषक खेळण्यावर आहे. ३७, ३८व्या वर्षीही फिटनेस कामय ठेवण्यावर त्याचा भर असेल.
सूर्यकुमार यादव म्हणाला, “सध्या मी जवळपास ३४-3३५ वर्षांचा झालो आहे. मला वाटतं, जर मी पुढील तीन ते चार वर्षे व्हाईट-बॉल क्रिकेटवर योग्य प्रकारे लक्ष केंद्रित केलं, तर ते माझ्यासाठी आणि संघासाठी दोघांसाठीही चांगलं ठरेल. त्यामुळे मी संघासाठी अजून प्रभावीपणे योगदान देऊ शकेन. खरं सांगायचं तर, २०२८ ऑलिम्पिक आणि त्या वर्षीचा टी-२० विश्वचषक खेळणं माझ्या डोक्यात आहे. गोष्टी कशाप्रकारे घडतील यावर नजर असेल. सध्याच्या घडीला आणि येत्या वर्षांमध्ये मला स्वत:ला फिट ठेवायचं आहे, कारण जेव्हा तुम्ही ३७-३८ वर्षांचे होता, तेव्हा फिटनेस हा अधिक महत्त्वाचा असतो.”
सूर्यकुमार यादवने सांगितलं की, जर तो क्रिकेटपटू नसता, तर नक्कीच तो व्यवसायिक झाला असता. कारण त्याच्या पत्नीला बिझेनसची चांगली जाण आहे आणि तिच्याशी सतत बोलताना त्यांना आपल्या व्यवसायिक समजुतीची आणि दृष्टिकोनाची जाणीव झाली आहे.
सूर्यकुमार यादव म्हणाला, “मी क्रिकेटपटू नसतो तर १०० टक्के मी बिझनेस केला असता. मला बिझनेसची थोडी जाण आहे आणि माझं लग्न झाल्यापासून मी बिझनेस करू शकतो याचा अंदाज मला आहे. कारण माझी पत्नी देविशा ही बिझनेस असलेल्या कुटुंबातील आहे. तिच्याशी बोलत असताना मला जाणवलंय की मी जर क्रिकेट खेळत नसतो तर मी माझे पैसे दुप्पट, तिप्पट किंवा चौपट पटीने बिझनेसमधून कमावले असते.”