गेल्या काही वर्षांपासून बाबर आझमने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपलं नाव प्रस्थापित केलं आहे. गेल्या काही वर्षांतली त्याची कामगिरी पाहता पाक क्रिकेट बोर्डाने बाबर आझमला पाकिस्तानच्या वन-डे आणि टी-२० संघाचं कर्णधारपदही दिलंय. इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेतही बाबरने आतापर्यंत आश्वासक खेळ केला आहे. परंतू इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसैनच्या मते बाबर आझमला आयपीएलमध्ये खेळण्याची गरज आहे.

“मला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकारणात पडायचं नाही. पण हे दोन्ही देश एकमेकांशी खेळत नाही म्हणजे प्रिमीअर लिग स्पर्धेत मँचेस्टर सिटी मँचेस्टर युनायटेड सोबत खेळत नाहीये असं वाटतं. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानी खेळाडू आयपीएलमध्ये खेळत होते, परंतू यानंतर बिघडलेल्या राजकीय संबंधांमुळे पाकिस्तानी खेळाडूंना प्रवेश नाकारण्यात आला. पण माझ्यामते बाबर आझम सारख्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची गरज आहे.” एका खासगी कार्यक्रमात बोलत असताना हुसैनने आपलं मत मांडलं.

भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, बीसीसीआयने यंदाचा आयपीएल हंगाम युएईत आयोजित केला आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.