गतविजेता जेन्कीन्स आठव्या स्थानी; सुपर गटात पितांबर, तर चॅम्पियन्स गटात नागार्जुना आघाडीवर

फॉम्र्युला-वन शर्यतीच्या वेळापत्रकातून २०१३ साली इंडियन ग्रां.प्रि. हद्दपार झाल्यानंतर भारतात टी-वन प्रायमा ट्रक शर्यतीचा उदय झाला. गेट्रर नोएडा येथील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर गेली चार वष्रे वेगाच्या थरारासाठी आसुसलेल्या क्रीडाप्रेमींना टी-वन प्रायमा शर्यतीने आपलेसे केले. एरवी फॉम्र्युला-वन शर्यतीत परदेशी शर्यतपटूंच्या नावाने जयघोष करणाऱ्या देशी चाहत्यांसाठी टी-वन प्रायमाने भारतीय शर्यतपटू सर्किटवर उतरवले. टी-वनच्या चौथ्या पर्वात यात आणखी भर घालत आयोजकांनी भारतीय शर्यतपटूंची सुपर क्लास आणि चॅम्पियन्स क्लास अशा दोन गटांत विभागणी केली. त्यामुळे देशी क्रीडाप्रेमींनी ही स्पर्धा डोक्यावर घेतली आहे. हे करत असताना परदेशात टी-वनचा दबदबा कायम रहावा, यासाठी दिग्गज शर्यतपटूंसाठी प्रो क्लास कायम ठेवण्याची चतूर खेळीही आयोजकांनी केली.

रविवारी बुद्ध इंटरनॅशनल सर्किटवर चौथी टी-वन प्रायमा ट्रक शर्यत पार पडणार आहे आणि त्यासाठी झालेल्या पात्रता शर्यतीत गतविजेत्यांसमोर कडवे आव्हान उभे राहिलेले दिसले. मुख्य शहरापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या सर्किटवर प्रेक्षकांची चांगली उपस्थिती जाणवत होती. पात्रता शर्यतीत प्रो क्लास गटात गतविजेत्या डेव्हिड जेन्कीन्सला कडव्या आव्हानाचा सामना करावा लागला. क्युमिन्स संघाच्या या अमेरिकन खेळाडूने १ मिनिट १९.३५१ सेकंदाची जलद वेळ नोंदवली, परंतु सात खेळाडूंनी त्यापेक्षा कमी कालावधीत टप्पा पूर्ण करून जेन्कीन्सला मुख्य शर्यतीतील आव्हानाची जाणीव करून दिली. डीलर्स डेअरडेव्हिल्सचा चेक प्रजासत्ताकचा शर्यतपटू डेव्हिड व्हर्सेकीने १:४८.६४१ सेंकदांत टप्पा पूर्ण करुन मुख्य शर्यतीत अग्रस्थान निश्चित केले. त्याचाच सहकारी अँटोनियो अल्बॅकेटे (स्पेन) आणि डिलर्स वॉरियर्सचा गेर्ड कोर्बेर (जर्मनी) हे अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरुन मुख्य शर्यतीत सुरुवात करणार आहेत.

नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या चॅम्पियन्स गटात गत मोसमातील अव्वल भारतीय शर्यतपटूंचा समावेश असणार आहे. या गटात नागार्जुनने १:५०.२९४ सेंकदाच्या वेळेसह मुख्य शर्यतीतील अग्रस्थान निश्चित केले. त्यापाठोपाठ मलकित सिंग (१:५०.७०६ से.) आणि शंकर कुमार सिंग (१:५१.७७८ से.) हे मुख्य शर्यतीत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावरून सुरुवात करतील.

सुपर क्लास गटात पितांबर (१:५०.४२२ से.), मुंबारिक (१:५१.११४ से.) आणि गुरुजंत सिंग (१:५१.४२६ से.) हे अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावरुन मुख्य शर्यतीला सुरुवात करतील.