टी २० मालिकेच्या अंतिम फेरीत भारतानं श्रीलंकेसमोर विजयासाठी ८२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. भारताने ८ गडी गमवून ८१ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने २८ चेंडूत २३ धावांची नाबाद खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज चांगली कामगिरी करू शकला नाही. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली. भारताचा कर्णधार शिखर धवन महत्त्वाच्या सामन्यात भोपळाही फोडू शकला नाही. पहिल्याच षटकात चमीराच्या गोलंदाजीवर धनंजया डि सिल्वा हाती झेल देऊन बाद झाला. त्यानंतर संघाच्या २३ धावा असताना देवदत्त पडिक्कल बाद झाला. संघाच्या २४ धावा असताना संजू सॅमसन बाद झाला. संजू सॅमसन शून्यावर बाद झाला. त्यानंतर ऋतुराज गायवाडही चांगली कामगिरी करू शकला नाही. त्याच्या वैयक्तिक १४ धावा असताना हसरंगाच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. नितीश राणाही भारता डाव सावरू शकला नाही. दासून शनाकाने त्याच्याच गोलंदाजीवर त्याचा झेल घेत तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर तळाच्या फलंदाजांनी डाव सारवण्याचा प्रयत्न केला. मात्र भुवनेश्वर कुमार १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर चहर ५ धावा करून तंबूत परतला. तर वरुण चक्रवर्थी खातंही खोलू शकला नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारताचा टी २० सामन्यातील निचांकी धावसंख्या

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (२००८) मेलबर्न, ७४ धावांवर सर्वबाद
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (२०१६) नागपूर, ७९ धावांवर सर्वबाद
  • भारत विरुद्ध श्रीलंका (२०२१) कोलंबो, ८ गडी बाद ८१ धावा
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२०१५) कटक, ९२ धावांवर सर्वबाद
  • भारत विरुद्ध श्रीलंका (२०१६) पुणे, १०१ धावांवर सर्वबाद

तीन सामन्यांच्या मालिकेत १-१ ने बरोबरी आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकत मालिका खिशात घालण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. श्रीलंकेतील प्रेमदासा मैदानावर अंतिम सामना आहे. श्रीलंका दौर्‍यावर वनडे मालिका २-१ने जिंकल्यानंतर शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडियाला टी-२० मालिका जिंकण्याची आज उत्तम संधी आहे. पहिला टी २० सामना भारताने ३८ धावांनी जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या टी २० सामन्यात श्रीलंकेने भारताला ४ गडी राखून पराभूत केलं होतं.

दुसऱ्या टी २० सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला गंभीर दुखापत झाल्याने आजच्या सामन्यात त्याला आराम देण्यात आला आहे. नवदीप सैनीने दुसऱ्या टी २० सामन्यात गोलंदाजी केली नव्हती. जखमी नवदीप सैनी याच्या जागेवर संदीप वॉरिअरला ११ खेळाडूच्या संघात स्थान मिळालं आहे. तर दुसरीकडे श्रीलंकेकडून पथुम निसांका पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे.

दोन्ही संघातील खेळाडू

भारत- ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, देवदत्त पडिक्कल, संजु सॅमसन, नितीश राणा, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, राहुल चहर, संदीप वॉरिअर, चेतन सकारिया, वरुण चक्रवर्थी

श्रीलंका- अविक्सा फर्नांडो, पथुम निसंका, मिनोद भानुका, सदीरा समरविक्रमा, दासुन शनाका, धनंजया डि सिल्वा, वानिन्दु हसरंगा, रमेश मेंडिस, चमिका करुनारत्ने, अकिला धनंजया, धुशमंथा चमीरा

 

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 final match india target 82 runs to srilanka rmt
First published on: 29-07-2021 at 21:31 IST