टी २० वर्ल्डकपच्या सुपर १२ फेरीत न्यूझीलंडने नामिबियाला ५२ धावांनी पराभूत केलं. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना ४ गडी गमवून १६३ धावा केल्या आणि विजयासाठी १६४ धावा दिल्या. तर नामिबियाचा संघ २० षटकात ७ गडी गमवून १११ धावा करू शकला. न्यूझीलंडने नामिबियाला ५२ धावांनी पराभूत केल्याने त्यांच्या धावगतीत सुधारणा झाली आहे. आता भारताला धावगतीत सुधारणा करण्यासाठी मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागेल. न्यूझीलंडने ३ विजयांसह ६ गुण मिळवले आहेत. तर धावगती +१.२७७ इतकी आहे. त्यामुळे भारताची उपांत्य फेरीची वाट बिकट आहे.

नामिबियाचा डाव
नामिबियाला स्टीफन बार्ड आणि लिंगेन जोडीने चांगली सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी ४७ धावांची भागीदारी केली. मात्र लिंगेन २५ धावा करून बाद झाला आणि धावसंख्येची गती कमी झाली. त्यानंतर बार्ड २१ धावा करून मिशेल सॅनटनरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. तर गेरहार्ड इरास्मुस जास्त काळ तग धरू शकला नाही. अवघ्या ३ धावा करून तंबूत परतला. डेविड विस (१६), झेन ग्रीन (१६), जेजे स्मिथ (९), निकोल इटॉन (०), क्रेग विलियम्स (०) या धावसंख्येवर तंबूत परतले.

न्यूझीलंडचा डाव

नामिबियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंडला फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं. सलामीला आलेल्या मार्टिन गुप्टिल आणि डेरिल मिशेल जोडीनं संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र संघाच्या ३० धावा असताना मार्टीन गुप्टिल बाद झाला. त्यानंतर डेरिल मिशेल १९ धावा करून तंबूत परतला. केन विलियमसनही २५ चेंडूत २८ धावा करून बाद झाला. त्याने २ चौकार आणि १ षटकार मारला. तर डेवॉन कॉनवे १७ धावांवर असताना धावचीत होत तंबूत परतला. पाचव्या गड्यासाठी ग्लेन फिलिप्स आणि जेम्स नीशम जोडीने ७६ धावांची भागीदारी केली. या खेळीमुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या उभारता आली. ग्लेन फिलिप्सने २१ चेडूंत ३९ धावा केल्या. या खेळीत १ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. तर जेम्स नीशमने २३ चेंडूत ३५ धावा केल्या. या खेळीत १ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

नामिबिया- क्रेग विलियम्स, कार्ल बिर्केनस्टोन, स्टीफन बार्ड, डेविड विस, गेरहार्ड इरास्मुस, मायकेल लिंगेन, निकोल लॉफ्टी इटॉन, झेन ग्रीन, बर्नार्ड स्कोल्ट्झ, रुबेन ट्रम्पलमॅन, जेजे स्मिथ

न्यूझीलंड- मार्टिन गुप्टिल, डेरील मिशेल, केन विलियमसन, डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, जेम्स नीशम, मिशेल सँटनर, एडम मिलने, टीम साउथी, इश सोढी, ट्रेंट बोल्ट