टी-२० विश्वचषकाच्या सुपर-१२ टप्प्यातील अंतिम सामन्यात भारताने नामिबियाला ९ गड्यांनी सहज मात दिली. या विजयासह भारताने आपल्या वर्ल्डकप मोहिमेचा शेवट गोड केला. महत्त्वाचे म्हणजे भारताचा टी-२० कप्तान म्हणून विराटचा तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रींचा हा शेवटचा सामना होता. दुबईच्या मैदानावर विराटने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. रवीचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्या फिरकी गोलंदाजीपुढे नामिबियाचे फलंदाज अपयशी ठरले. २० षटकात नामिबियाला ८ बाद १३२ धावा करता आल्या. जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३ तर बुमराहने २ बळी घेत नामिबियाला तंगवले. प्रत्युत्तरात रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी अर्धशतके ठोकत भारताचा विजय सुकर केला. रोहित आक्रमक अर्धशतक ठोकून माघारी परतला. त्यानंतर राहुल-सूर्यकुमारने विजयावर शिक्कामोर्तब केले. जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
भारताचा डाव
रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीवीरांनी मागील फॉर्म कायम राखत भारतासाठी दमदार सुरुवात केली. पॉवरप्लेमध्ये भारताचे अर्धशतक पूर्ण झाले. आठव्या षटकात रोहितने अर्धशतक पूर्ण केले. हे रोहितचे २४वे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक ठरले. १०व्या षटकात नामिबियाचा वेगवान गोलंदाज जॅन फ्रायलिंकने रोहितला बाद केले. रोहितने ७ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा केल्या. रोहितनंतर सूर्यकुमार यादवने आक्रमक फटके खेळले. १६व्या षटकात राहुलने चौकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुलने ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५४ तर सूर्यकुमार यादवने ४ चौकारांसह नाबाद २५ धावा केल्या.
हेही वाचा – T20 WC: सेमीफायनल गाठलेल्या इंग्लंडला ‘जबर’ धक्का..! २५० षटकार ठोकलेला खेळाडू गेला स्पर्धेबाहेर
नामिबियाचा डाव
नामिबियाचे सलामीवीर स्टीफन बार्ड आणि मायकेल व्हॅन लिंजेन यांनी ३३ धावांची सलामी दिली. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात लिंजेनला (१४) झेलबाद केले. त्यानंतर आलेल्या क्रेग विल्यम्सला पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने फिरकीत अडकवले. आठव्या षटकात जडेजाने सलामीवीर बार्डला पायचीत पकडले. बार्डने २१ धावा केल्या. यानंतर ठराविक अंतराने जडेजा-अश्विनने नामिबियाला धक्के दिले. अनुभवी फलंदाज डेव्हिड वीजाने २६ धावांचे योगदानन दिल्यामुळे नामिबियाला शतकी पल्ला ओलांडता आला. नामिबियाने २० षटकात ८ बाद १३२ धावा केल्या. भारताकडून जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३ तर बुमराहने २ बळी घेतले.
१६व्या षटकात राहुलने चौकार खेचत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुलने ४ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५४ तर सूर्यकुमार यादवने ४ चौकारांसह नाबाद २५ धावा केल्या.
१५व्या षटकात राहुलने अर्धशतक पूर्ण केले. त्याचे हे सलग तिसरे अर्धशतक ठरले.
१२व्या षटकात भारताने शतक पूर्ण केले. १२ षटकात भारताने १ बाद १०५ धावा केल्या.
१०व्या षटकात नामिबियाचा वेगवान गोलंदाज जॅन फ्रायलिंकने रोहितला बाद केले. रोहितने ७ चौकार आणि २ षटकारांसह ५६ धावा केल्या. १० षटकात भारताने १ बाद ८७ धावा केल्या. रोहितनंतर सूर्यकुमार यादव मैदानात आला आहे.
आठव्या षटकात रोहितने अर्धशतक पूर्ण केले. हे रोहितचे २४वे आंतरराष्ट्रीय टी-२० अर्धशतक ठरले. आठ षटकात भारताने बिनबाद ७० धावा केल्या.
पॉवरप्लेच्या ६ षटकात भारताने बिनबाद ५४ धावा केल्या. रोहित ३९ तर राहुल १५ धावांवर नाबाद आहे.
रोहितने आक्रमक पवित्रा धारण करत पाचव्या षटकात ११ धावा कुटल्या. ५ षटकात भारताने बिनबाद ४४ धावा केल्या.
तीन षटकार भारताने बिनबाद २६ धावा केल्या.
रोहित शर्मा आणि केएल राहुल या सलामीवीरांनी भारताच्या डावाची सुरुवात केली आहे. रुबेन ट्रम्पेलमनने नामिबियासाठी पहिले षटक टाकले.
नामिबियाने २० षटकात ८ बाद १३२ धावा केल्या. भारताकडून जडेजा आणि अश्विन यांनी प्रत्येकी ३ तर बुमराहने २ बळी घेतले.
१९व्या षटकात बुमराहने वीजाला बाद करत नामिबियाला आठवा धक्का दिला. वीजाने २६ धावा केल्या. १९ षटकात नामिबियाने ८ बाद ११९ धावा केल्या.
१७व्या षटकात नामिबियाने शतकी पल्ला ओलांडला. पुढच्या षटकात शमीने १२ धावा खर्च केल्या. १८ षटकात नामिबियाने ७ बाद ११४ धावा केल्या.
जडेजाने आपल्या शेवटच्या षटकात नामिबियाच्या स्मिटला बाद केले. पुढच्या षटकात अश्विनने नामिबियाला सातवा धक्का दिला. त्याने झेन ग्रीनची दांडी गुल केली. १६ षटकात नामिबियाने ७ बाद ९५ धावा केल्या.
१४ षटकात नामिबियाने ५ बाद ९० धावा केल्या.
अश्विनने १३व्या षटकात नामिबियाचा कप्तान गेरहार्ड इरास्मसला यष्टीपाठी झेलबाद केले. इरास्मसने ११ धावा केल्या. त्याच्यानंतर जेजे स्मिट मैदानात आला आहे. १३ षटकात नामिबियाने ५ बाद ७७ धावा केल्या.
दहाव्या षटकात रवीचंद्रन अश्विनने ईटनला (५) स्लीपमध्ये उभ्या अससेल्या रोहित शर्माकरवी झेलबाद केले. १० षटकात नामिबियाने ४ बाद ५१ धावा केल्या. ईटननंतर अनुभवी डेव्हिड वीजा मैदानात आला आहे.
आठव्या षटकात जडेजाने सलामीवीर बार्डला पायचीत पकडले. बार्डने २१ धावा केल्या. जॅन निकोल लोफ्टी-ईटन फलंदाजीसाठी मैदानात आला आहे. नऊ षटकात नामिबियाने ३ बाद ४७ धावा केल्या.
पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने विल्यम्सला फिरकीत अडकवले. पंतने त्याला यष्टीचीत करत शून्यावर माघारी धाडले. कप्तान गेरहार्ड इरास्मस मैदानात आला आहे. सहा षटकात नामिबियाने २ बाद ३४ धावा केल्या.
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने पाचव्या षटकात लिंजेनला (१४) झेलबाद केले. त्याच्यानंतर क्रेग विल्यम्स मैदानात आला आहे. पाच षटकात नामिबियाने १ बाद ३३ धावा केल्या.
बार्ड आणि लिंजेन यांनी चांगली सुरुवात केली. या दोघांनी तीन षटकात नामिबियासाठी २५ धावा केल्या.
नामिबियाचे सलामीवीर स्टीफन बार्ड आणि मायकेल व्हॅन लिंजेन मैदानात आले आहेत. मोहम्मद शमीने भारतासाठी पहिले षटक टाकले.
भारताने आज वरुण चक्रवर्तीला संघाबाहेर बसवले असून फिरकीपटू राहुल चहरला वर्ल्डकप पदार्पणाची संधी दिली आहे.
भारत – रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली (कप्तान), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, राहुल चहर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी.
नामिबिया – स्टीफन बार्ड, मायकेल व्हॅन लिंजेन, क्रेग विल्यम्स, गेरहार्ड इरास्मस (कप्तान), झेन ग्रीन (यष्टीरक्षक), डेव्हिड वीजा, जॅन फ्रायलिंक, जेजे स्मिट, जॅन निकोल लोफ्टी-ईटन, रुबेन ट्रम्पेलमन, बर्नार्ड शॉल्ट्झ.
विराटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि नामिबिया यांच्यात तब्बल १८ वर्षांनंतर सामना होणार आहे. या फॉरमॅटमध्ये दोन्ही संघ प्रथमच आमनेसामने येणार आहेत. २००३ च्या वर्ल्डकपमध्ये भारत आणि नामिबिया यांच्यात सामना झाला होता. नामिबियाचा संघ भारताला आव्हान देऊ शकतो कारण त्यांच्याकडे डावखुरे वेगवान गोलंदाज आहेत. नामिबिया विरुद्धचा हा सामना टीम इंडियाचा १५० वा टी-२० सामना असेल. या कालावधीत संघाने ९४ विजय मिळवले असून ५१ पराभव पत्करले आहेत.
भारत या स्पर्धेतून बाहेर पडला असेल पण पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे. दोन वेळचे विश्वविजेते वेस्ट इंडिज आणि श्रीलंका २०२२ च्या टी-२० विश्वचषकासाठी पात्र ठरू शकले नाहीत. या दोन्ही संघांना आता क्वालिफायर सामन्यांमध्ये भाग घ्यावा लागणार आहे.
टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या शर्यतीतून भारत बाहेर पडला आहे. या गट-२ मधून पाकिस्तान आणि न्यूझीलंडने बाद फेरीत प्रवेश केला. सुपर-१२ टप्प्यातील सामन्यात न्यूझीलंडने अफगाणिस्तानचा पराभव करताच भारताच्या आशाही संपुष्टात आल्या. गट १ मधून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचले.