अफगाणिस्तानमध्ये न्यूझीलंडला हरवण्याची क्षमता आहे, असे मत भारताचा माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याने व्यक्त केले. टी२० विश्वचषक २०२१ च्या सुपर १२ सामन्यात अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडचा संघ रविवारी अबू धाबी येथे आमनेसामने येणार आहेत. टी-२० वर्ल्डकपमध्ये सध्या भारताच्या आशा या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या सामन्यावर अवलंबून आहेत. या सामन्यात जर अफगाणिस्ताननं न्यूझीलंडला हरवलं, तरच भारतीय संघाला सेमी फायनलमध्ये जाण्याची संधी असेल. या पार्श्वभूमीवर समस्त भारतीयांनी अफगाणिस्तानच्या विजयासाठी प्रार्थना सुरू केल्याचे चित्र आहे.
अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामनाही भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. जर न्यूझीलंडने हा सामना जिंकला तर भारताचा टी-२० विश्वचषक स्पर्धेतील प्रवास संपुष्टात येईल. म्हणजेच उपांत्य फेरी गाठण्याच्या त्याच्या आशा संपुष्टात येतील. दुसरीकडे, जर अफगाणिस्तान जिंकला आणि सोमवारी भारताने नामिबियावर मात केली, तर तिन्ही संघ (भारत, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान) सहा गुणांवर बरोबरीत राहतील. आणि अशा परिस्थितीत ज्या संघाचा रनरेट चांगला असेल तोच संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.
ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना भारताचे माजी खेळाडू अजित आगरकर यांना अफगाणिस्तान खरोखरच न्यूझीलंडला हरवू शकतो का? असा प्रश्न विचारण्याच आला. त्यावर आगरकर यांनी अर्थातच हो म्हटले. याचे कारणही त्यांनी सांगितले.
“अफगाणिस्तानला न्यूझीलंडला हरवण्याची संधी आहे. त्यांच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत आणि चांगले गोलंदाजसुद्धा आहेत. हा सामना दुपारी होत आहे आणि अशा परिस्थितीत त्यांच्या फिरकीपटूंनाही विकेटची मदत होईल. यासोबतच न्यूझीलंडची फलंदाजीही फारशी मजबूत दिसत नाही. गेल्या दोन सामन्यांत त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानने चांगली गोलंदाजी केल्यास ते न्यूझीलंडला अडचणीत आणू शकतात,” असे अजित आगरकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अफगाणिस्तानच्या नजरा त्यांचा फिरकी गोलंदाज मुजीब-उर-रहमानच्या फिटनेसवरही आहेत. गेल्या दोन सामन्यांत तो खेळला नाही. मुजीबने स्कॉटलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २० धावांत पाच बळी घेतले होते. यानंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध १४ धावांत एक विकेट घेतली.