टी२० विश्वचषकाचा ३४वा सामना झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स यांच्यात ॲडलेड मध्ये खेळला जात आहे. झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी नेदरलँड्ससमोर विजयासाठी ११८ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. झिम्बाब्वेचा संघ १९.२ षटकात ११७ धावांवर गारद झाला. हा सामना जर झिम्बाब्वेने गमावला तर त्यांचे आव्हान संपुष्टात येईल.
झिम्बाब्वेचा कर्णधार क्रेग एरविनने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय हा सपशेल चुकीचा ठरला. पहिल्या सहा षटकात केवळ २० धावांत झिम्बाब्वेने तीन गडी गमावले होते. शॉन विलियम्स आणि अष्टपैलू सिकंदर रझा या दोघांनाच केवळ दोन आकडी धावसंख्या करता आली. शॉन विलियम्सने २३ चेंडूत २८ धावा केल्या तर सिकंदर रझाने २४ चेंडूत ४० धावा केल्या. त्यांच्या या ४८ धावांच्या भागीदारीने झिम्बाब्वेला शंभरी गाठता आली.
नेदरलँड्सच्या संघाने भेदक गोलंदाजी करत झिम्बाब्वेला ११७ धावावर रोखले. नेदरलँड्स कडून पॉल व्हॅन मीकरेनने सर्वाधिक तीन गडी बाद केले. तर ब्रँडन ग्लोव्हर, बास डी लीडे आणि लोगन व्हॅन बीक यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. वेगवान गोलंदाज फ्रेड क्लासेनला एक गडी बाद करण्यात यश मिळाले. नेदरलँड्स अगोदरच या विश्वचषकातून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे.